सिडनी : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज नॅथन लायनने एक अनोखा विक्रम केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शानदार गोलंदाजी करत त्याने ५ बळी घेतले. त्याच्या पंजामुळे ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला २१२ धावांत गारद केले.
कसोटी कारकिर्दीमध्ये लायनने वीस वेळा पाच विकेट घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये २० किंवा त्याहून अधिक वेळा ५ बळी घेणारा लायन आता ऑस्ट्रेलियाचा ५वा गोलंदाज ठरला आहे. याआधी शेन वॉर्न (३७), ग्लेन मॅकग्रा (२९), डेनिस लिली (२३) आणि क्लेरी ग्रिमेट यांनी (२१) विकेट घेतल्या.
आशियाई खेळपट्टीवर नॅथन लायनने एका डावात ५ विकेट्स घेऊन शेन वॉर्नच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. वॉर्नने आशियामध्ये ९ वेळा एका डावात ५ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. पहिल्या डावात लायनने २५ षटकांत ९० धावांत ५ बळी घेतले.
श्रीलंकेविरुद्ध ५ विकेट घेऊन त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणा-या गोलंदाजांच्या बाबतीत लायन १२व्या क्रमांकावर पोहोचला. त्याने सर रिचर्ड हॅडलीला मागे टाकले आहे. आता तो रंगना हेराथची बरोबरी करण्यापासून फक्त १ विकेट दूर आहे. कपिल देव यांच्या ४३४ विकेट्सचा टप्पाही तो लवकरच पार करेल. कपिलला मागे टाकल्यानंतर त्याचा कसोटी क्रिकेटमधील टॉप १० गोलंदाजांमध्ये समावेश होईल.
ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणा-यांच्या यादीत नॅथन लायन तिस-या स्थानावर आहे. या यादीत पहिल्या स्थानावर शेन वॉर्न आहे. त्याने १४५ सामन्यात ७०८ विकेट घेतल्या आहेत. १२४ सामन्यात ५६३ विकेटे घेणारा ग्लेन मॅक्ग्रा या यादीत दुस-या क्रमांकावर आहे. त्या पाठोपाठ नॅथन लायनचा नंबर लागतो. लायन हा २०११ पासून कसोटी क्रिकेट खेळत आहे.