मुंबई : ऑस्ट्रेलियात होणा-या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवान गोलंदाज उमरान मलिक भारतीय संघात आवश्यक आहे, असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले.
मुंबईत ‘पेमेंट्झ’ आणि १९८३ मधील विश्वविजेता भारतीय संघ यांच्यातर्फे ‘दी १९८३ वर्ल्डकप ओपस’ या चित्रग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी कर्णधार कपिल देव, मोहिंदर अमरनाथ, कीर्ती आझाद, रॉजर बिन्नी, सय्यद किरमाणी, मदनलाल, संदीप पाटील, बलविंदर संधू, कृष्णम्माचारी श्रीकांत, सुनील वॉल्सन, दिलीप वेंगसरकर, पी. आर. मान सिंग यांच्यासह विश्वविजेते सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमप्रसंगी वेंगसरकर म्हणाले, ‘‘उमरानमधील गुणवत्ता वाखाणण्याजोगी आहे. ‘आयपीएल’मध्येही छाप पाडत ट्वेन्टी-२० प्रकारात सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे त्याने सिद्ध केले आहे. त्यामुळे विश्वचषकासाठी तो संघात हवा. या संधीचे उमरान सोने करेल, अशी मला खात्री आहे.’’