मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिका आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पण या मालिकेसाठी आता बीसीसीआयने एक नवीन नियम बनवला आहे. हा नियम खेळाडूंच्या चांगलाच पथ्यावर पडणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिका ९ जूनपासून सुरू होणार आहे. पण यापूर्वी झालेल्या आयपीएलमध्ये जो नियम होता, त्यामध्ये आता बीसीसीआयने बदल केला आहे.
यापूर्वी बीसीसीआयने या मालिकेसाठी खेळाडूंना कोरोना चाचणी करणे अनिवार्य केले आहे, या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यावरच त्या खेळाडूला सामना खेळता येणार आहे. पण बीसीसीआयने या मालिकेसाठी नवीन नियम बनवत बायो बबल हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांना क्वारंटाईन राहावे लागणार आहे. त्यामुळे खेळाडूंसाठी ही दिलासादायक गोष्ट असेल. पण बायो बबलचा नियम ठेवला नसला तरी बीसीसीआयने खेळाडूंसाठी एक अट ठेवली आहे. या मालिकेसाठी बायो बबल नसले तरी खेळाडूंना सार्वजनिक कार्यक्रमांना जाता येणार नाही. ज्या कार्यक्रमांना गर्दी असेल तेथे जाण्यास खेळाडूंना बीसीसीआयने मज्जाव केला आहे.
आता खेळाडू या गोष्टींचे पालन कसे करतात याकडे सर्वांचे लक्ष असेल. शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेच्या संघातील सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. सर्व खेळाडूंच्या कोरोना चाचण्यांचे अहवाल आता समोर आले आहेत आणि सर्व खेळाडूंची चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सराव करायला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.