नवी दिल्ली : देशात काही महिन्यांनी टी-२० वर्ल्ड कप सामने होणार आहेत. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चांगले संबंध नाहीत. त्यामुळे पाकिस्तानच्या संघाला भारतामध्ये प्रवेश द्यायचा की नाही, याबाबत बराच वाद सुरु होता. पण बीसीसीआयने आता पाकिस्तानला भारतात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्याच्या घडीला संबंध चांगले नाहीत. त्यामुळे भारताचा व्हिसा आपल्याला मिळणार नाही, असे पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाला वाटत होते. भारतामध्ये जर आम्हाला प्रवेश देण्यात येणार नसेल, तर हा विश्वचषक दुसरीकडे खेळवण्यात यावा, अशी भूमिका पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने काही दिवसांपूर्वी घेतली होती. त्यावेळी भारताकडून आमच्या संघाला आणि चाहत्यांना व्हिसा मिळेल, याची हमीही पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने आयसीसीकडे मागितली होती. या गोष्टीवर अखेर बीसीसीआयने आपला निर्णय दिला आहे.
बीसीसीआयने याबाबत आयसीसीबरोबर संवाद साधला आहे. या संवादामध्ये आम्ही पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला भारतामध्ये येऊन विश्वचषक खेळण्यासाठी व्हिसा देणार आहोत, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा संघ भारतामध्ये येऊन ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्पर्धेचे ठिकाण बदलण्याची होती शक्यता
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये २०१२-१३ पासून एकही क्रिकेटची मालिका झालेली नाही. गेल्या आठ वर्षांमध्ये एकदाही पाकिस्तानचा क्रिकेट संघ भारतामध्ये आलेला नाही. त्याचबरोबर पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना आयपीएलमध्येही संधी देण्यात आलेली नाही. पण विश्वचषक ही मोठी स्पर्धा असते आणि त्याचे आयोजन आयसीसी करत असते. त्यामुळे जर यजमान देशाने एका संघाला जर व्हिसा दिला नाही तर स्पर्धेबाबत अन्य निर्णयही होऊ शकतो. त्यामुळे बीसीसीआयने हे पाऊल उचलल्याचे समजत आहे.
भररस्त्यात कारने घेतला पेट; अकलूज-सांगोला रोडवरील दुर्घटना