पंचकुला : हरियाणामधील पंचकुला या ठिकाणी पार पडलेल्या खेलो इंडिया २०२२ स्पर्धेत महाराष्ट्राच्या सर्वच खेळाडूंनी चांगलेच मैदान गाजवले. तब्बल ४५ सुवर्णपदके, ४० रौप्य आणि ४० कांस्यपदकावर नाव कोरल्यानंतर एक यशस्वी चमू म्हणून महाराष्ट्र या स्पर्धेत नावारुपाला आला. या कामगिरीमुळे सर्वच स्तरातून महाराष्ट्राच्या खेळाडूंचे कौतुक होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या खेळाडूंचे कौतुक केले.
महाराष्ट्राची क्रीडा परंपरा उज्ज्वल आहे. या क्रीडा परंपरेचा गौरव वाढवणारी आणि महाराष्ट्राच्या नावाला सुवर्णपदकांनी झळाळी देण्याची कामगिरी आपल्या जिगरबाज खेळाडूंनी केली आहे. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणा-या खेळाडूंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. या यशासाठी स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि व्यवस्थापक आदींचे तसेच खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहणा-या त्यांच्या कुटुंबियांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत कांस्य आणि रौप्य पदकांसह सुवर्ण पदकांनादेखील गवसणी घातली. आज स्पर्धेच्या अखेरच्या दिवशीदेखील महाराष्ट्राच्या मुलांसह मुलींच्या खो-खो संघाने सुवर्णपदक पटकावले. विशेष म्हणजे दोन्ही संघानी अंतिम सामन्यात ओरिसाच्या संघाला पराभूत केले. मुलींच्या स्पर्धेत तिस-या स्थानावर पंजाब आणि पश्चिम बंगाल राहिला. तर मुलांमध्ये पश्चिम बंगाल आणि दिल्लीला कांस्यपदक मिळाले.
स्पर्धेचा शेवटचा दिवस गोड
स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राच्या खो-खो संघांनी सुवर्ण पदक पटकावत स्पर्धेचा शेवट गोड केला. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी विजय मिळवल्यानंतर जय भवानी-जय शिवाजी असा जयघोष झाला. त्यानंतर महाराष्ट्राने आणलेल्या ढोलाच्या तालावर खेळाडूंनी नाचही केला. त्यात ओरिसा आणि पश्चिम बंगालमधील खेळाडूदेखील सहभागी झाले. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.