कराची : शुक्रवारी कराचीमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणा-या खेळाडूंच्या जिवाला धोका होता. दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या सुरक्षेमुळे पीएसएल पुढे ढकलले जाऊ शकते, असे बोलले जात होते, परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष नजम सेठी म्हणाले की, दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) सुरूच राहणार आहे. तसेच खेळाडूंना आणि अधिका-यांना राष्ट्रपती दर्जाची सुरक्षा पुरवली जाणार आहे.
तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी शुक्रवारी संध्याकाळी शहराच्या मुख्य रस्त्यांपैकी एक असलेल्या शार-ए-फैसलजवळील कराची पोलिस कार्यालयावर हल्ला केला. हल्ल्याच्या वेळी ग्लॅडिएटर्स संघाचे खेळाडू नॅशनल स्टेडियममध्ये सराव करत होते. ज्यामुळे त्यांना त्यांच्या हॉटेलमध्ये परत जाण्यास उशीर झाला.
पीसीबी प्रमुख नजम सेठी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, पीएसएल ८ नियोजित प्रमाणे पुढे होईल. शुक्रवारची घटना क्रिकेटशी संबंधित नव्हती. आम्ही स्थानिक आणि परदेशी सुरक्षा तज्ज्ञांसह सर्व भागधारकांसह जवळून काम करत आहोत. पीसीबी सर्व सहभागींना संपूर्ण सुरक्षा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. नेहमीप्रमाणे सुरक्षातज्ज्ञ आणि कायदा अंमलबजावणी एजन्सींसोबत मिळून काम करत राहील. कोणतीही कसर सोडू नये, यासाठी राष्ट्रपती स्तरावरील सुरक्षा दल संघ आणि अधिका-यांना प्रदान करण्यात आले आहे.