सर्व खेळाडूंची पतियाळा येथे करोना चाचणी होणार
नवी दिल्ली : टोक्यो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या भारताच्या बॉक्सरचे प्रशिक्षण प्रशासकीय कारणास्तव आठवडाभराने लांबले आहे. भारताच्या पुरुष आणि महिला बॉक्सरचे सराव शिबीर १० जूनपासून पतियाळा येथे सुरू होणार होते.
‘‘भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून आणि सरकारकडून परवानगीची वाट पाहात आहोत. एक ते दोन दिवसांत ही परवानगी मिळणे अपेक्षित आहे. मात्र त्यामुळे एक आठवडाभर सराव सत्र लांबणीवर पडले आहे,’’ असे भारतीय बाक्सिंग महासंघाचे कार्यकारी संचालक आर. के. साचेती यांनी सांगितले.
अमित पांघल (५२ किलो), मनीष कौशिक (६३ किलो), विकास कृष्णन (६९ किलो), आशीष कुमार (७५ किलो), सतीश कुमार (+९१ किलो), मेरी कोम (५१ किलो), सिमरनजीत कौर (६० किलो), लवलिना बोर्गोहेन (६९ किलो) आणि पूजा राणी (७५ किलो) हे भारताचे नऊ बॉक्सर टोक्यो ऑलिंपिकसाठी पात्र ठरले आहेत.
‘‘सर्व खेळाडूंना पतियाळा येथे आणल्यावर त्यांची करोना चाचणी करण्यात येणार आहे. मात्र या सर्व गोष्टींमध्ये एक आठवडा जाईल. लवकरच यादृष्टीने सर्व काही कार्यवाही होईल अशी अपेक्षा आहे,’’ असे साचेती यांनी स्पष्ट केले. करोनामुळे बॉक्सिंगसारख्या शरीराशी संपर्क येणाºया खेळाकरता नवे नियम आखण्यात आले आहेत. त्यानुसार बॉक्सरना एकमेकांविरुद्ध सराव करता येणार नाही. त्यांना त्यांच्या स्वत:हून आणलेल्या साहित्यामध्ये सराव करणे बंधनकारक आहे.
Read More WHO ला दिली माहिती : 7 दिवसांत रुग्ण बरा; भारतीय डॉक्टरनं औषध शोधल्याचा दावा