25.7 C
Latur
Thursday, December 2, 2021
Homeक्रीडापाठलाग करण्यात पंजाब व चेन्नई अपयशी

पाठलाग करण्यात पंजाब व चेन्नई अपयशी

एकमत ऑनलाईन

मैदान दुबईचे असो, अबु धाबीचे असो वा अगदी शारजाहचे तेराव्या आयपीएलमध्ये गेल्या काही सामन्यात आव्हानाचा पाठलाग यशस्वी होत नाही. पाठलाग करणारा संघ विजयाची आशा असताना हरतोय. अबूधाबी त कोलकता विरुध्द पंजाब विजया जवळ येऊन हरला. तर दुबईत विराटच्या झंझावातासमोर चेन्नई गारद झाली. चेन्नईचा पराभव मात्र फारच अनाकलनीय होता

चेन्नईने सात सामन्यात पाच पराभव स्वीकारले आहेत।

कोलकता संघाने पंजाब विरुद्ध चा सामना दोन धावांनी जिंकला. विजयाचा चौकार लगावताना कोलकता संघ आता चौथ्या स्थानावर आला. तर, पंजाबचा पराभवाचा षटकार नोंदला गेला. ते अखेरच्या स्थानावर आले आहेत. प्रथम फलंदाजी करताना कोलकता संघाने निर्धारित २० षटकांत ६ बाद १६४ धावा केल्या. शुभमन गिल (५७) आणि कर्णधार दिनेश कार्तिक (५८) यांनी उपयुक्त फलंदाजी केली. पंजाबकडून पुन्हा एकदा नवोदित रवी बिष्णोई आणि अर्षदीप सिंग यांनी अचूक गोलंदाजी केली. त्यानंतर बिनबाद शतकी सलामी दिल्यानंतरही पंजाबचा डाव ५ बाद १६२ असा मर्यादित राहिला. सुनील नारायण या फिरकी गोलंदाजीलाच याचे पूर्ण श्रेय जाते. अखेरच्या टप्प्यात त्याने केलेली गोलंदाजी निर्णायक ठरली.

आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल या सलामीच्या जोडीने झकास सलामी दिली. षटकामागे सातची धावगती राखून त्यांनी पंजाबला शतकी सलामी दिली. अवघे १६५ धावांचे आव्हान असताना ही सलामी पंजाबचा आत्मविश्वास उंचावणारी होती.  तोवर त्यांनी पंधरा षटके संपली होती प्रसिद्ध कृष्णाने मयांकला बाद केले. त्यानंतर निकोलस पूरन फलंदाजीला आल्यामुळे पंजाबचा विजय अधिक सुकर वाटला. पण, चेंडू फटकाविण्यासाठी फटक्याची निवड अचूक करायची असते हे तो विसरला. नारायणने त्याच्या आक्रमकतेला डिवचत त्याचा बचाव भेदला. बढती मिळालेला प्रभसिमरनही फटकेबाजीचे दडपण पेलू शकला नाही.

त्या वेळी दोन्ही संघांवर सारखे दडपण होते. पण, तशाही क्षणी नितीश राणाने मागे पळत जात घेतलेला झेल सुरेख होता. आशा असणारा राहुलही मग आपली एकाग्रता हरवून बसला. अगदी शेवटी फलंदाजीला आलेल्या ग्लेन मॅक्सवेलसमोर सहा चेंडूंत १४ धावा करण्याचे आव्हान होते. मात्र, सुनील नारायणने संयमाने गोलंदाजी करताना अकराच धावा देताना मनदीपची विकेट मिळवली. अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकून सामना टाय करण्याचा मॅक्सवेलने जरूर प्रयत्न केला. पण, हाय रे  दैवा आजचा दिवस पंजाबचा नव्हताच. षटकार दोन इंचाने हुकला आणि तो चौकार झाला.

संघ निवडीपासून राहुलचे निर्णय चुकत गेले. धडाकेबाज ख्रिस गेलला पंजाबने आजही ड्रेसिंगरुममध्येच ठेवले. गोलंदाजांना हातळताना राहुलने जी चुणूक दाखवली, ती फलंदाजी करताना दाखवू शकला नाही. आक्रमकतेच्या अभाव त्याच्या खेळीत दिसून आला. तो सेट झाल्यानंतरही अधिक सावधपणे खेळत होता. शतकी सलामी दिल्यानंतर निकोलस पूरनने फटकेबाजीची केलेली घाई, महत्वाच्या क्षणी मॅक्सवेलच्या अनुभवाला डावलून प्रभसिमरनला बढती देण्याचा निर्णय अनाकलनीय होता. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या सांघिक कामगिरीवर झाला.

प्रथम फलंदाजी करताना कोलकताला या वेळीही चांगली सुरवात मिळाली नाही. या सामन्यात राहुल त्रिपाठी लवकर बाद झाला. त्यानंतर नितीश राणाही स्थिरावू शकला नाही. शुभमन गिलला इयॉन मॉर्गनने सुरेख साथ केली. पण, त्याची भागीदारी मोठी होई शकली नाही. या अडचणीच्या काळात कर्णधार दिनेश कार्तिक(२९ चेंडूत५८)ने शुभमनला मोलाची साथ केली. त्यांनी ४३ चेंडूंत केलेली ८२ धावांची भागीदारीच कोलकताचे आव्हान भक्कम करण्यात महत्वाची ठरली.

तेराव्या आयपीएल स्पर्धेत शनिवारी चेन्नई विजयाचा पाठलाग करू शकली नाही. बंगळूरूने कर्णधार विराट कोहलीच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर चेन्नईचा ३७ धावांनी पराभव केला. या विजयाने बंगळूरू  चौथ्या स्थानावर आला.

प्रथम फलंदाजी करताना बंगळूर संघाने ४ बाद १६९ धावांची मजल मारली. टी २० क्रिकेटमध्ये ही धावसंख्या नक्कीच आव्हानात्मक वाटत नसली, तरी एक वेळ ही देखील त्यांना अशक्य वाटत होती. कोहलीच्या एका हाती खेळीने त्यांना हे शक्य झाले. चेन्नई संघाला सलामीची जोडी फॉर्मात असताना आव्हान नक्कीच कठिण नव्हते. पण, पुन्हा एकदा त्यांचा फलंदाज अपयशी ठरले आणि त्यांचा डाव ८ बाद १३२ असा मर्यादित राहिला. यंदाच्या मोसमात पहिलाच सामना खेळणाऱ्या ख्रिस मॉरिसने तीन, तर वॉशिंग्टन सुंदरने दोन गडी बाद केले.

विजयासाठी आव्हान फारसे कठिण नव्हते. पण, संथ होत जाणाऱ्या खेळपट्टीवर एखादी कोहलीसारखी खेळी चेन्नईकडून होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. पहिलाच सामना खेळणाऱ्या मॉरिसने आपला अनुभव पणाला लावताना चेन्नईच्या शेन वॉटसन, फाफ डू प्लेसी या सलामीच्या जोडीच्या अनुभवाचा कस पाहिला. सलामीची जोडी फुटल्यावर जगदीशन आणि अंबाती रायुडू ही जोडी चांगली जमली. त्यांनी संयमाने चेन्नईचा डाव रेटला होता. अधून मधून मोठे फटके खेळत त्यांनी धावांची गती राखण्याचे प्रयत्न चालू ठेवले. या जोडीने ६४ धावांची भागीदारी केली. चोरटी धाव घेण्याच्या नादात जगदीशन बॅट घासायचे विसरला आणि धावबाद झाला.

ही जोडी फुटली काय चेन्नईचे अवसानच गळाल्या सारखे झाले. धोनी फटकेबाजीच्या मोहात अडकला. सॅमही स्थिरावू शकला नाही. एका धावेच्या अंतराने हे दोघे बाद झाले आणि पाठोपाठ इम्प्रोव्हायजेशनच्या नावाखाली रायुडूने आपल्या यष्ट्या उघड्या ठेवून गोलंदाजाला जणू त्रिफळा उडविण्यासाठी आमंत्रित केले. त्यामुळे चेन्नईने पराभव स्विकारून नंतर २० षटके पूर्ण खेळण्याची आणि ऑल आऊट होऊ न देण्याची औपचारिकता पार पाडली. प्रथम फलंदाजी करताना अखेरच्या ५ षटकांत निघालेल्या ७० धावा बंगळूरचे आव्हान भक्कम करण्याच महत्वाच्या ठरल्या. चेन्नईच्या गोलंदाजांच्या अचूक कामगिरीने बंगळूरला एकवेळ १४० धावाही शक्य वाटत नव्हत्या.

पण, कोहलीच्या एका हाती खेळीने त्यांना हे शक्य झाले. कोहलीने प्रथम पडीक्कलच्या साथीत ५३ आणि नंतर महत्वाच्या क्षणी शिवम दुबेच्या साथीत ७६ धावा जोडल्या. हीच भागीदारी त्यांच्यासाठी महत्वाची ठरली. दीपक चहर, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकूर यांनी चांगली गोलंदाजी केली. पण, सॅम करन महागडा ठरला. ब्राव्हो आणि ठाकूर यांना अखेरच्या टप्प्यात टप्पा राखण्यात अपयश आले.कोहलीच्या नाबाद ९० धावांच्या खेळीचे वैशिष्ट्य म्हणजे फटकेबाजीच्या खेळातही त्याने ५० धावा पळून काढल्या. उर्वरित ४० धावांत त्याने प्रत्येकी चार चौकार आणि चार षटकार लगावले.

-डॉ.राजेंद्र भस्मे

कोरोना रुग्णांची सेवा करणा-याचा संसर्गाने मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या