23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeक्रीडापी.व्ही.सिंधूने कांस्यपदक जिंकून इतिहास रचला

पी.व्ही.सिंधूने कांस्यपदक जिंकून इतिहास रचला

एकमत ऑनलाईन

टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये दिमाखात वाटचाल करणा-या पी. व्ही. सिंधूचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले असले, तरी तिने कांस्यपदक नावावर करत इतिहास रचला आहे. आज रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा २१-१३, २१-१५ असा पाडाव केला. याआधी मिराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती. आता सिंधूने भारताला कांस्यपदक मिळवून दिले. या विजयासह ती ऑलिम्पिक स्पर्धेत २ पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे.

सिंधूने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. तिच्या व्यतिरिक्त दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवालने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. बिंग जिआओविरुद्धच्या सामन्यात सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत पहिल्या गेममध्ये ११-८ अशी आघाडी घेतली. यानंतर १६-१०, १९-१२ अशी आघाडी टिकवली आणि पहिला गेम २१-१२ असा जिंकला. दुस-या गेममध्येही ५-२ अशी आघाडी घेतली. जिआओने पुन्हा ११-११ अशी बरोबरी साधली पण विश्वविजेत्या सिंधूने १६-१३ अशी आघाडी वाढवली आणि कांस्य पदकावर नाव कोरले. या अगोदर सिंधू बॅडमिंटनमधील सुवर्ण पदक पटकावेल, अशी भारतीयांना आशा होती. परंतु शनिवारी झालेल्या सामन्यात तिचा ताय झू यिंगने जगज्जेत्या सिंधूला धूळ चारली. त्यामुळे प्रचंड मेहनत घेऊनही सिंधूचे सुवर्णस्वप्न अधुरेच राहिले.

लव्हलिनाचेही पदक निश्चित
टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकल्यानंतर भारताचा ‘पदकदुष्काळ’ सुरू होता. मात्र, आता सिंधूने कांस्य पदक मिळवून त्यात आणखी एक भर घातली, तर आता बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेननेदेखील पदक निश्चित केले आहे. तिने उपांत्यपूर्व सामन्यात महिलांच्या ६९ किलो वजनी गटात चायनीज तैपेईच्या माजी विश्वविजेत्या नीन-शिन चेनला नामोहरम केले. ४ जुलैला उपांत्य सामन्यात तिची लढत टर्कीच्या विश्वविजेत्या बुसेनाझ सुर्मेनेलीसोबत होणार आहे. लव्हलिना आसाममधील बरोमुखिया गावात राहणारी आहे. आता तिच्या घराजवळ जाणारा कच्चा मार्ग व्यवस्थित करण्याचे काम सुरू झाले आहे.

भारतीय पुरुष हॉकी संघ उपांत्य फेरीत
भारतीय पुरूष हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताने ब्रिटनला ३-१ ने पराभूत केले. भारतीय संघ सुवर्णपदकापासून दोन विजय दूर आहे. जवळपास ४ दशकानंतर भारतीय पुरूष हॉकी संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाकडून १-७ ने पराभवाचे तोंड पाहिल्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले. अ गटातील ५ पैकी ४ सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटेनला पराभूत करत उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना बेल्जियमशी होणार आहे.

सिंधूवर शुभेच्छांचा वर्षाव
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यं पदक मिळवून देणा-या सिंधूवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद शुभेच्छा देण्यातही पहिले आले आहेत. त्यापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, माजी केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी, परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्यासह अनेक राजकीय तसेच क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी सिंधूचे अभिनंदन करत तिला शुभेच्छा दिल्या.

ऑलिम्पिक बॅडमिंटनमध्ये भारताचे तिसरे पदक
सायना नेहवाल
कांस्यपदक: लंडन ऑलिम्पिक (२०१२)

पीव्ही सिंधू
कांस्य पदक: रिओ डी जानेरो (२०१६)

पीव्ही सिंधू
कांस्य पदक: टोकियो ऑलिम्पिक (२०२०)

ओबीसी आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात याचिका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या