दिलीप वेंगसरकर, विनोद कांबळी यांचा विक्रम मोडला!
मुंबई : रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईने दुस-या दिवशी मध्य प्रदेशविरुद्ध चांगल्या धावा केल्या. पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वाखाली खेळणा-या मुंबईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी त्यांचा निम्मा संघ २४८ धावांवर माघारी परतला. पण, आज सर्फराज खान पुन्हा एकदा मुंबईसाठी संकटमोचक ठरला. मधल्या फळीतील या फलंदाजाने २४३ चेंडूत १३४ धावांची महत्त्वाची खेळी करताना मुंबईला पहिल्या डावात ३७४ धावांचा पल्ला गाठून दिला. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशने चहा पानाच्या ब्रेकपर्यंत ४३ धावा केल्या.
४१ जेतेपद नावावर असलेल्या मुंबईला पृथ्वी (४७) व यशस्वी जैस्वाल (७८) यांनी चांगली सुरुवात करून दिली, परंतु मध्य प्रदेशच्या गोलंदाजांनी पुनरागमन केले. पण, सर्फराज खिंड लढवत राहिला. पहिल्या दिवशी ४० धावांवर नाबाद राहिलेल्या सर्फराजने आज चांगली फटकेबाजी केली. त्याने १९० चेंडूत ११ चौकारांसह शतक पूर्ण केले. ही शतकी खेळी केल्यानंतर त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
सर्फराजने रणजी करंडक स्पर्धेतील मागील १६ डावांमध्ये १ तिहेरी शतक, दोन द्विशतक, ३ वेळा १५०+ धावसंख्या , आता अंतिम सामन्यात एक शतक आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. रणजी करंडक २०२१-२२ मध्ये त्याने सर्वाधिक ९३७ धावा केल्या आणि मागच्या वर्षीचा स्वत:चाच ९२८ धावांचा विक्रम मोडला. त्याने पुन्हा एकदा विनोद कांबळीचा ८८० (१९९७-९८) आणि दिलीप वेंगसरकर यांचा ८६९ (१९९०-९१) यांचा विक्रम मोडला.
दरम्यान, पृथ्वीने ७९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारांसह ४७ धावांची खेळी केली. त्यानंतर मध्य प्रदेशने टप्प्याटप्प्याने मुंबईला धक्के दिले. अरमान जाफर ( २६) व सुवेध पारकर (१८) यांच्या अपयशाने मुंबईची डोकेदुखी वाढवली होती. पण, यशस्वी खिंड लढवत होता. तो १६३ चेंडूंचा सामना करून ७ चौकार १ षटकार खेचून ७८ धावांवर बाद झाला. सर्फराज व हार्दिक तामोरे यांनी मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सारांश जैनने ही भागीदारी तोडली. तामोरे २४ धावांवर बाद झाला.