बंगळुरू : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाची महिला प्रीमियर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आरसीबीने बुधवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती दिली आहे. आरसीबी क्रिकेट संघाची मार्गदर्शक म्हणून मिळालेल्या ऑफरनंतर आपल्याला स्वत:ला आश्चर्य वाटले होते, पण नंतर ही ऑफर स्वीकारल्याचे सानियाने म्हटले आहे.
आरसीबी हा एक लोकप्रिय संघ आहे आणि आयपीएलमध्ये अनेक वर्षांचा फॉलो केलेला संघ आहे. त्यांनी महिला प्रीमियर लीगसाठी एक संघ तयार करताना पाहून मला खूप आनंद होत असल्याचे सानियाने म्हटले आहे.
मी २० वर्षांहून अधिक काळ व्यावसायिक अॅथलीट आहे. माझे पुढचे काम तरुण महिला आणि तरुणींना खेळ हा त्यांच्या करिअरच्या पहिल्या पर्यायांपैकी एक असू शकतो हे पटवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सानियाने म्हटले आहे.
कोणत्याही खेळातील दबाव हाताळणे ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी आपण खेळाडूंसोबत त्यांच्या मानसिक पैलूवर काम करणार असल्याचे यावेळी सानियाने सांगितले. क्रिकेट आणि टेनिसमध्ये खूप समानता आहेत. सर्वांत मोठे चॅम्पियन ते आहेत जे दबाव हाताळू शकतात.