24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeक्रीडाकोलकाता रिकाम्या हाताने परत

कोलकाता रिकाम्या हाताने परत

एकमत ऑनलाईन

 

आयपीएलची साखळी फेरी जसजशी जवळ येत आहे तसतसे नवनवीन संघर्ष दिसू लागले आहेत. गुजरात २० गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. लखनौ १८ गुण झाले असले तरी राजस्थानने चेन्नईला हरवले तर त्यांचेही अठरा गुण होतील. गुजरात पहिल्या क्रमांकावर आल्याने त्यांना फायनलसाठी दोन संधी उपलब्ध आहेत.
बुधवारी नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर लखनौ विरुद्ध कोलकाता यांच्यात ६६वा सामना झाला. सामना रोमहर्षक झाला. केकेआरला विजयासाठी शेवटच्या चार षटकांत ६७ धावांची गरज होती. मोहसिन खानने सतराव्या षटकात १२, आवेश खानच्या अठराव्या षटकात १७, होल्डरच्या एकोणिसाव्या षटकात १७ धावा फटकावल्या. केकेआरला शेवटच्या सहा चेंडूंत एकवीस धावांची गरज होती आणि ते फक्त १८ धावा करू शकले त्यामुळे लखनौ दोन धावांनी विजयी झाली.

शेवटी दोन चेंडूंत विजयासाठी तीन धावांची गरज होती. केकेआर सामना जिंकणार असे शंभर टक्के वाटत असताना लेविसने अफलातून झेल घेत रिंकू सिंगला तंबूत पाठवले आणि सामन्याचा निकाल बदलला. खरेतर लखनौ बाद फेरीसाठी पात्र होती पण केकेआर जिंकले असते तर त्यांचा नेट रनरेटवर प्ले ऑफ निश्चित झाला असता लखनौच्या सलामीवीर जोडीने या सामन्यात विक्रमांची रास लावली आणि इतिहास घडवला. के. एल. राहुल आणि क्विंटन डी कॉकने मिळून आतापर्यंतची आयपीएलमधील सर्वांत मोठी सलामीवीरांची भागीदारी साकारली. कर्णधार के. एल. राहुलने सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. राहुल आणि क्विंटन डी कॉक डावाची सुरुवात करण्यासाठी आले आणि शेवटपर्यंत नाबाद राहिले.

दोघांनी मिळून २१०नाबाद धावांची भागीदारी केली आणि केकेआरला विजयासाठी २११ धावांचे लक्ष्य मिळाले. यामध्ये डी कॉकने ७० चेंडंूत २०० च्या स्ट्राईक रेटसह १४० धावांचे योगदान दिले. या धावा करण्यासाठी त्याने १० चौकार आणि १० षटकार मारले. राहुलने ५१ चेंडंूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या. दरम्यान, ही पहिली वेळ आहे जेव्हा आयपीएलमध्ये प्रथम फलंदाजी करणा-या संघाने एकही विकेट गमावली नाही. लखनौचा हा पहिला आयपीएल हंगाम आहे आणि त्यांनी पहिल्याच हंगामात ही कामगिरी करून दाखवली. तसेच लखनौची धावसंख्या ही आयपीएलच्या इतिहासात एकही विकेट न गमावता उभी केली गेलेली सर्वांत मोठी धावसंख्या आहे. डी कॉकने मोसमातील पहिले शतक झळकावत सर्वोच्च धावसंख्या उभारली.

प्रत्युत्तरात केकेआरच्या सलामीवीरांनी स्वस्तात विकेट्स गमावल्या, पण त्यानंतर प्रत्येक खेळाडूने महत्त्वाचे योगदान दिले. दुस-या डावात चर्चा झाली ती केकेआरचा रिंकू सिंग आणि लखनौच्या एविन लुईसची. लखनौने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारली. रिंकू सिंगने अवघ्या १५ चेंडूंत ४० धावा केल्या. तो विजय मिळवून देण्याच्या मानसिकतेसह खेळत होता. परंतु शेवटच्या षटकात एविन लुईसने त्याचा जबरदस्त झेल पकडला आणि सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटले. शेवटच्या दोन चेंडंूत केकेआरला तीन धावांची आवश्यकता होती. त्यावेळी स्ट्राईकवर रिंकू सिंग होता आणि मार्क्स स्टॉईनिस गोलंदाजी करत होता. मैदानात तणावपूर्ण वातावरण होते आणि अशात रिंकूने षटकातील या पाचव्या चेंडूवर मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला.

रिंकू जरी सेट झाला असला तरी दबावाच्या परिस्थितीत तो शॉट त्याला नीट मारता आला नाही आणि लुईसने संधी साधली. चेंडू हवेत असताना लुईस धावत आला आणि शेवटच्या क्षणी एका हातात अफलातून झेल पकडला आणि लखनौच्या डगआऊटमध्ये सामना जिंकल्यासारखा जल्लोष झाला. त्यावेळी संघ जिंकला नसला तरी हा झेल घेणे म्हणजे सामना जिंकल्यासारखेच होते. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि इतर सर्व संघ रिंकूची विकेट मिळाल्यानंतर अतिशय उत्साहात दिसले. त्यांचा व्हीडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. कोलकाताकडून कर्णधार श्रेयस अय्यर याने सर्वाधिक धावा फटकावल्या. त्याने २९ चेंडंूत अर्धशतक झळकावले. त्यात ३ षटकार आणि ४ चौकारही मारले. त्याच्याबरोबरच नितीश राणा (४२) आणि रिंकू सिंग(४०) यांनीही चिवट झुंज दिली.

सुनील नारायणनेही शेवटच्या ७ चेंडूंत नाबाद २१ धावा फटकावल्या. तरीही कोलकाताला विजयाची चव चाखता आली नाही. या डावात लखनौकडून मार्क्स स्टॉयनिस याने मॅच विनिंग गोलंदाजी केली. त्याने शेवटची २ महत्त्वपूर्ण षटके टाकताना किफायतशीर गोलंदाजी केली. २ षटकांमध्ये २३ धावा देत त्याने अतिशय महत्त्वाच्या ३ विकेट्स काढल्या आणि संघाला शेवटच्या चेंडूवर सामना जिंकून दिला. स्टॉयनिसव्यतिरिक्त मोहसिन खान यानेही अतिशय शानदार गोलंदाजी करत ३ विकेट्स घेतल्या.
डॉ. राजेंद्र भस्मे
कोल्हापूर, मो. ९४२२४ १९४२८

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या