नवी दिल्ली : नुकतेच दुखापतीतून सावरून पुनरागमन करणा-या रोहित शर्माला उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेमुळे माघारी परतल्याने संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत होता, तर उपकर्णधार चेतेश्वर पुजारा होता.
भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेला मुकला होता. तसेच पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीही तो उपलब्ध नव्हता. आयपीएलमधील सामन्यात दुखापत झाल्यांनतर त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन कार्यक्रम पूर्ण केला. ११ डिसेंबरला फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्यांनतर तो १४ तारखेला ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला होता. सिडनीत १४ दिवसांच्या विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर तो ३० डिसेंबरला भारतीय संघात सामील झाला. त्याने सरावाला सुरुवात केल्याचे छायाचित्रही बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले होते.
रोहित शर्माची आता उपकर्णधारपदी नियुक्ती झाल्याने कर्णधार आणि उपकर्णधाराच्या जबाबदा-या दोन्ही मुंबईकर सांभाळणार आहेत. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे नेतृत्वाची कमान सांभाळत आहे. भारत-ऑस्ट्रेलियाच्या मालिकेतील तिसरा सामना ७ जानेवारीपासून सिडनीच्या मैदानावर खेळविण्यात येईल.
लाल मुंग्यांच्या चटणीने कोरोना बरा होऊ शकतो?