नवी दिल्ली : सचिन तेंडुलकरला त्याचे चाहते क्रिकेटचा देव म्हणून संबोधतात. सचिन तेंडुलकरने अनेक विश्वविक्रम आपल्या नावावर केले आहे. त्याने जागतिक ख्यातीच्या अनेक गोलंदाजांची लय बिघडवली होती. मात्र पाकिस्तानचा शोएब अख्तरच्या बाबतीत थोडी वेगळी गोष्ट घडली. शोएब अख्तर आपल्या कारकिर्दित सचिन तेंडुलकरला खूप महत्व देतो. इतकेच नाही तर अख्तर अल्लाहनंतर सचिन तेंडुलकरला दुस-या स्थानावर ठेवतो.
पाकिस्तानकडून ४४४ आंतरराष्ट्रीय विकेट घेणा-या शोएब अख्तरच्या मते तो सचिन तेंडुलकरला बाद केल्यामुळेच इतक्या दीर्घकाळ क्रिकेट खेळू शकला. त्याने १९९९ मध्ये कोलकात्याच्या इडन गार्डनमध्ये खेळल्या गेलेल्या आशियाई टेस्ट चॅम्पियनशिपच्या एका सामन्यातील किस्सा सांगितला. त्यावेळी शोएब अख्तरने आपल्या पहिल्याच चेंडूवर रावळपिंडी एक्सप्रेसने सचिनची शिकार केली होती.
स्पोट्सकीडाशी बोलताना शोएब अख्तर म्हणाला की, ज्यावेळी सचिन तेंडुलकर फलंदाजी करण्यास आला होता त्यावेळी वसिम अक्रमने मला रिव्हर्स स्विंग करण्याचा सल्ला दिला होता. अक्रम म्हणाला होता. की चेंडू खेळपट्टीवर पडल्यानंतर स्टम्पवर गेला पाहिजे. मी देखील सचिनला बाद करण्यासाठी उत्सुक होतो. मी माझा रन अप सुरू केला. मी लक्ष केंद्रित केले होते. आदल्या चेंडूवर राहुल द्रविडचा त्रिफळा उडवलेला शोएब अख्तरचा आत्मविश्वास द्विगुणित झाला होता. तो म्हणाला की, रन अपच्यावेळी मी सचिनची बॅकलिफ्ट पाहिली त्यावेळी मी त्याला बाद करू शकतो याची कल्पना आली होती. त्याची बॅकलिफ्ट फार उंच होती.
चेंडू देखील चांगला रिव्हर्स स्विंग होत होता. चेंडू खेळपट्टीवर पडल्यानंतर वेगाने आत आला. सचिन तेंडुलकर क्लीन बोल्ड झाला. भारताचे सगळे फॅन्स एकदम सुन्न झाले. मैदानात फक्त आमचाच आवाज घुमत होता. शोएब पुढे म्हणाला की, मी ज्यावेळी सकलेन मुश्ताकला क्रिकेटचा देव कोणाला म्हटले जाते असे विचरले तर त्याने सचिन तेंडुलकरचे नाव घेतले. ज्यावेळी मी त्याला बाद करेन त्यावेळी काय होईल असे विचारल्यावर मुश्ताकने गेल्या दोन कसोटीत मी त्याला बाद केले आहे असे तो म्हणाला. तेव्हापासून आमच्या सचिनला बाद करण्यासाठी एक मैत्रीपूर्ण युद्धच सुरू झाले होते. अल्लाहनंतर जर कोणी मला स्टार बनवले असेल तर तो सचिन तेंडुलकर आहे.