23.4 C
Latur
Sunday, August 9, 2020
Home क्रीडा सेरी-ए फुटबॉल स्पर्धा : रोनाल्डोचे विक्रमी अर्धशतक

सेरी-ए फुटबॉल स्पर्धा : रोनाल्डोचे विक्रमी अर्धशतक

नवी दिल्ली : अव्वल फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने तीन मिनिटांच्या अंतरात दोन गोल केल्याने युव्हेंटसने सेरी-ए फुटबॉल स्पर्धेत लॅझियोला २-१ असे नमवले. रोनाल्डो सेरी-ए, इंग्लिश प्रीमियर लीग, ला-लिगा या स्पर्धांमध्ये ५० गोल करणारा पहिला फुटबॉलपटू ठरला. या विजयाबरोबरच युव्हेंटसने विक्रमी सलग नवव्या विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली आहे.

येत्या आठवड्यातच युव्हेंटसला विजेतेपदावर शिक्कामोर्तब करण्याची संधी आहे. अजून या स्पर्धेत चार लढती बाकी असल्या तरी युव्हेंटसला इंटर मिलानवर आठ गुणांची आघाडी घेता आली आहे. युव्हेंटसने लॅझियोविरुद्ध सलग तिसरा विजय नोंदवला आहे. युव्हेंटसला डिसेंबरमध्ये सेरी-ए आणि इटालियन सुपर चषकात लॅझियोकडून सलग दोन पराभव स्वीकारावे लागले होते. रोनाल्डोने ५१व्या मिनिटाला पेनल्टीवर पहिला, तर ५४व्या मिनिटाला दुसरा गोल केला. लॅझियोकडून फुटबॉलपटू सिरो इमोबाईलने ८३व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला. रोनाल्डो आणि सिरो यांनी या स्पर्धेच्या हंगामात सर्वाधिक प्रत्येकी ३० गोल नोंदवले आहेत.

रोनाल्डो सेरी-एमध्येही सर्वांत वेगवान ५० गोल करणारा फुटबॉलपटू ठरला. ‘‘विक्रम हे मोडण्यासाठीच असतात, मात्र संघाचा विजय झाला ही महत्त्वपूर्ण बाब आहे. आमचा युव्हेंटस संघ सर्वोत्तम असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. यापुढेही आम्हाला अशीच उंचावलेली कामगिरी करायची आहे,’’ असे रोनाल्डोने सांगितले.

Read More धनादेश अनादर प्रकरणी येरमाळा येथील एकाला सहा महिने कारावास

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,140FansLike
94FollowersFollow