इस्लामाबाद : 2005 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात फक्त अनफिट आहे म्हणून नाही, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि तत्कालीन कर्णधाराने माझ्यावर बलात्काराचा खोटा आरोप लावून संघातून बाहेर काढले, असा सनसनाटी आरोप ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ नावाने परिचित पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने केला आहे.
शोएब अख्तरने ‘हेलो लाईव्ह’वर मोठा गौप्यस्फोट केला. माझ्यावरील बलात्काराचे खोटे आरोप त्यांनी आजपर्यंत मागे घेतले नसल्याचेही अख्तर म्हणाला. पाकिस्तानी क्रिकेट संघातील खेळाडूच्या एका चुकीमुळे माझ्यावर बालंट आलं आणि मला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. मी हा प्रसंग कधीच कोणत्या मीडियामध्ये प्रसिद्ध केला नव्हता, असा दावा शोएबने केला.
‘पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड आणि संघातील खेळाडू अनेकदा माझ्या मीडियातील प्रसिद्धीमुळे मला त्रास देण्याचा प्रयत्न करायचे. मला मिळालेली प्रसिद्धी आणि यश हे माझ्या मेहनतीचे फळ आहे. मला त्रास देणारे ते खेळाडू आज नामशेष झाले, तर मला आजही संपूर्ण क्रिकेट विश्वात ओळखले जाते. तसेच भारतातही मला कधी द्वेषाला सामोरे जावे लागले नाही. भारतात मला नेहमी प्रेम मिळाले आहे’ असं शोएब अख्तर म्हणाला.
Read More इंग्लंडविरूद्ध कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ आज दाखल होणार
हेलो लाईव्हमध्ये शोएबने विराट कोहली आणि बाबर यांच्यातील तुलना चुकीची असल्याचेही सांगितले. शोएबच्या मते विराटला कसोटी, एकदिवसीय सामने मोठ्या प्रमाणात खेळण्याची संधी मिळते. पण पाकिस्तानात आता क्रिकेटची परिस्थिती बेताची आहे. खेळाडूंना म्हणावी तशी संधी उपल्बध होत नाही. आणि पाकिस्तान क्रिकेटच्या तिजोरीत खडखडाट असल्याने खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची जास्त संधी मिळत नाही. त्यामुळे विराट आणि बाबर यांच्यातील तुलना चुकीची आहे. दोन्ही खेळाडू आपआपल्या जागेवर उत्तम कामगिरी करत असून आपआपल्या देशाचे नाव उंचावत आहेत, असं तो म्हणाला. शोएबने भारतीय कर्णधारांविषयी बोलताना सांगितले की जर आज महेंद्रसिंग धोनीने संघाला नाव मिळवून दिले असेल, तर सौरव गांगुलीने भारताच्या संघाचा पाया रचला होता. सौरवने भारतीय संघासाठी त्यावेळी योग्य निर्णय घेतले. आधी पाकिस्तान संघ भारताला सहज हरवून जायचा, पण सौरवने तयार केलेल्या भारतीय संघाने पाकिस्तानला अनेक वेळा पराभूत करुन स्वतःला सिद्ध केले आहे, अशा शब्दात शोएबने गांगुलीवर स्तुतिसुमने उधळली.
तत्कालीन पाक कर्णधाराने बलात्काराचे खोटे आरोप लावून मला संघातून काढले : शोएब अख्तर @shoaib100mph #shoaibakhtar pic.twitter.com/2EK0dct40c
— Anish Bendre (@BendreAnish) June 9, 2020