नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट कसोटी आणि वनडे संघाची कर्णधार मिताली राजने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३९ वर्षीय मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ वर्षे भारताचे प्रतिनिधित्व केले. तिच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर चर्चेला उधाण आले. दरम्यान, क्रिकेट जगतात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. तिच्या निवृत्तीसह माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीदेखील चर्चेत आला आहे. दोघांच्या निवृत्तीमध्ये अनेक साम्य दडले असल्याचे सांगण्यात येत आहे.
दोघांनी भारतासाठी सर्वाधिक सामने खेळले, धोनीने कर्णधार म्हणून ३३२ वेळा टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले, तर भारतीय महिला संघ मिताली राजच्या नेतृत्वाखाली १९५ वेळा खेळला.
एकदिवसीय विश्वचषकात धोनी आणि मिताली राज यांनी भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. यादरम्यान दोन्ही खेळाडूंनी अर्धशतके झळकावली.
धोनी आणि मितालीच्या अर्धशतकांमुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आणि भारत विश्वचषकातूनही बाहेर पडला. विश्वचषकानंतर दोन्ही खेळाडूंनी फेयरवेल मॅच न खेळता निवृत्ती घेतली. महेंद्रसिंग धोनीने २०१९ च्या विश्वातील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना इंग्लंडमध्ये खेळला होता. या स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत भारताला न्यूझिलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. धोनीने पुढील वर्षी १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
३९ वर्षीय मिताली राजने ८ जून रोजी ट्विटरवर निवृत्तीची घोषणा केली. मिताली राजने न्यूझिलंडमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तिच्या नेतृत्वाखाली संघ उपान्त्य फेरीपूर्वी बाहेर पडला.
हा त्याच्या कारकीर्दीतील शेवटचा विश्वचषक असल्याचे बोलले जात होते आणि तसेच झाले. काही वर्षांपूर्वी त्याने टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती.