नवी दिल्ली : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्समध्ये परतले आहेत. दादाला फ्रेंचायझीचे ‘क्रिकेट संचालक’ बनवण्यात आले आहे. गांगुली याआधीच दिल्ली फ्रेंचायझीमध्ये सामील झाला आहे आणि सध्या सुरू असलेल्या दिल्ली प्रशिक्षण शिबिरातही तो उपस्थित आहे, परंतु अधिकृतपणे आज त्याला देण्यात आलेली जबाबदारी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी आयपीएल २०१९ मध्ये सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्सचा मार्गदर्शक होता.
आपल्या या नव्या जबाबदारीबद्दल सौरव गांगुली म्हणाला, ‘मी दिल्ली कॅपिटल्समध्ये परतण्यास उत्सुक आहे. गेल्या काही महिन्यांपासून मी दिल्ली कॅपिटल्सच्या वेगवेगळ्या संघांशी संबंधित आहे. महिला प्रीमियर लीग प्रिटोरिया कॅपिटल्समध्ये दिल्ली फ्रेंचायझी महिला संघासोबत माझा चांगला प्रवास झाला. आता मी आयपीएलच्या आगामी हंगामाची वाट पाहत आहे.
माझ्या शेवटच्या कार्यकाळात दिल्ली कॅपिटल्सने संघ म्हणून चांगली कामगिरी केली. यावेळीही मला तीच आशा आहे. यावेळी मी खेळाडूंशी आधीच संपर्क साधला आहे आणि मला त्यांना एक मजबूत गट म्हणून बघायचे आहे. पुढील काही महिने आपल्या सर्वांचा वेळ चांगला जाईल अशी आशा आहे.
सौरव गांगुलीच्या मार्गदर्शनाखाली आयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने दमदार कामगिरी केली होती. हा संघ गुणतालिकेत तिस-या क्रमांकावर होता.