24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्रीडाप्रेक्षकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा ; भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी पोलिसांच्या सूचना

प्रेक्षकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा ; भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी पोलिसांच्या सूचना

एकमत ऑनलाईन

नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान नागपुरात होणा-या टी-२० क्रिकेट सामन्यासाठी ५०० अधिकारी आणि दोन हजार कर्मचारी असा अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील मैदानावर शुक्रवारी (२३ सप्टेंबर) हा सामना होणार आहे. नागपूर शहरापासून जामठापर्यंतच्या मार्गावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था लावली जाईल अशी माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

नागपूर-वर्धा महामार्गावर असलेल्या जामठा स्टेडियमवर मॅचच्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी होते, हा आजवरचा अनुभव आहे. हीच बाब लक्षात घेऊन पोलिसांनी यंदा वेगळे नियोजन केले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मॅच पाहायला येणा-या प्रेक्षकांनी सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा वापर करावा. यंदा कार पार्किंग स्टेडियमपासून दीड किलोमीटर अंतरावर असल्याने प्रेक्षकांनी शक्यतो कारने येणे टाळावे, कारने मॅच पाहण्यासाठी यायचे असल्यास ड्रायव्हरचा वापर करावा, अशा सूचनाही नागपूर पोलिसांनी केल्या आहेत.

मॅच संपल्यानंतर जामठा स्टेडियमपासून नागपूर शहराच्या दिशेने येणा-या मार्गावर ग्रीन कॉरिडोर निर्माण केला जाणार आहे. त्यामुळे रात्री साडेनऊ ते मध्यरात्री बारा दरम्यान या मार्गावर कोणालाही वाहनांची पार्किंग करता येणार नाही, असेही नागपूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागपूर मेट्रोची सेवा खापरीपर्यंत उपलब्ध असून मॅचच्या दिवशी मेट्रोकडून अतिरिक्त फे-या सुरू राहतील. तर खापरी मेट्रो स्टेशनपासून जामठा स्टेडियमपर्यंत विशेष बससेवाही उपलब्ध राहणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

हॉटेलबाहेर पोलिसांचा बंदोबस्त
भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ बुधवारी चार्टर्ड विमानाने नागपुरात दाखल झाला आहे. रेडिसन ब्लू आणि ली मेरिडियन या हॉटेलमध्ये दोन्ही संघातील खेळाडूंचा मुक्काम आहे. या दोन्ही हॉटेलमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान २१ ते २४ सप्टेंबर असा मुक्काम दोन्ही संघाचा नागपुरात असेल. मैदानावरील सराव आणि सामन्यांमध्ये संघासोबत पोलिसांची टीम बंदोबस्तात राहील.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या