21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeक्रीडापहिल्याच सामन्यात श्रीलंकेचा धुव्वा

पहिल्याच सामन्यात श्रीलंकेचा धुव्वा

एकमत ऑनलाईन

कोलंबो : कर्णधार शिखर धवन, पृथ्वी शॉ आणि पदार्पणवीर इशान किशन यांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने श्रीलंकेवर ७ गडी राखून शानदार विजय मिळवला. धवनने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत नाबाद ८६ धावा ठोकल्या. आक्रमक सलामी देणारा पृथ्वी शॉ सामनावीरचा मानकरी ठरला. या विजयामुळे ३ सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली.

येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २६२ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर या धावांचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार शिखर धवन, पृथ्वी शॉ यांनी आक्रमक सुरुवात केली. जोरदार फटकेबाजी करताना पृथ्वी २४ चेंडूत ४३ धावा काढून बाद झाला. त्यानंतर ‘बर्थडे बॉय’ इशान किशनने ३३ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५९ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर मनीष पांडेने २६, तर सूर्यकुमार यादवने ३१ धावांचे योगदान दिले. दुसरीकडे कर्णधार शिखर धवनने संयमी खेळी करत एक बाजू लावून धरली आणि नाबाद ८६ धावांची खेळी करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी श्रीलंकेकडून मिनोद भानुका आणि अविष्का फर्नांडो जोडीने पहिल्या गड्यासाठी ४९ धावांची भागीदारी केली. त्यावेळी फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलने आपल्या पहिल्याच षटकात मैदानावर स्थिरावलेल्या अविष्का फर्नांडोला बाद केले. मनीष पांडेने त्याचा झेल घेतला. त्याने ३२ धावा केल्या. त्यानंतर भारताचा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने पदार्पणवीर भानुका राजपक्षाला त्यानंतर मिनोद भानुकाला बाद करत लंकेला संकटात टाकले. शतकाच्या आत सुरुवातीचे तीन गडी बाद झाल्यानंतर कर्णधार दासुन शनाका आणि चरिथा असालांकाने लंकेला स्थिरता दिली.

असालांकाने ३८ तर शनाकाने ३९ धावांचे योगदान देत लंकेला दोनशे धावांच्या पार पोहोचवले. टीम इंडिया लंकेला अडीचशेच्या आत गुंडाळणार असे वाटत असताना चमिका करुणारत्नेने भुवनेश्वर कुमारवर हल्ला चढवला. त्याने भुवनेश्वरच्या शेवटच्या षटकात १९ धावा कुटत संघाला २६२ अशी धावसंख्या गाठून दिली. करुणारत्नेने २ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने नाबाद ४३ धावा केल्या. भारताकडून दीपक चहर, कुलदीप यादव आणि यजुर्वेंद्र चहल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

आष्टा येथे झाडे पडल्याने वाहतूक ठप्प

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या