नवी दिल्ली : भारत विरुद्ध न्यूझिलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना रविवारी पावसामुळे रद्द झाला. मात्र, क्रिकेट जगतात चर्चा सुरू आहे ती म्हणजे सूर्यकुमार यादवची. सूर्यकुमार नेहमीच आपल्या कामगिरीने चाहत्यांच्या मनावर राज्य गाजवताना दिसत आहे. अशातच, सूर्यकुमारचा एक व्हीडीओ चर्चेत आला आहे.
त्यामध्ये तो पीच सुकवायला मैदानात उतरला असल्याचे पाहायला मिळत आहे. सूर्यकुमार यादव न्यूझिलंडच्या दौ-यावर फार चांगल्या फॉर्ममध्ये दिसून येत आहे. न्यूझिलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये त्याने तुफान फलंदाजी केली. तर दुस-या वनडे सामन्यात पाऊस आल्यानंतरही सूर्याने चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वळवले.
पावसामुळे खेळ थांबवण्यात आला होता. अशावेळी खेळ पुन्हा सुरू व्हावा यासाठी ग्राऊंड मेस मैदानात निरीक्षण करण्यासाठी आणि पीच सुकवण्यासाठी मेहनत करत होते. अशातच सूर्यकुमार यादवने या स्टाफची मदत केल्याचे दिसून आले. यावेळी सूर्याने त्यांना मदत करत ग्राऊंडमॅनच्या गाडीत बसून मैदानाची जवळून पाहणी देखील केली. यावेळी सूर्या फार गंभीरतेने हे काम पाहत असल्याचे दिसले.
भारत आणि न्यूझिलंड संघातला दुसरा वन डे सामना अखेर पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. नियोजित वेळेनुसार सामना सुरू झाला खरा पण दोन वेळा पावसाने हजेरी लावली आणि मॅचमध्ये अडथळा आणला. अखेर पाऊस थांबण्याची चिन्हं नसल्याने आणि किमान २० ओव्हर्सचा खेळही शक्य नसल्याने शेवटी हा सामना रद्द करण्यात आला.