34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeक्रीडाटीम इंडियाने उडवला इंग्लंडचा धुव्वा

टीम इंडियाने उडवला इंग्लंडचा धुव्वा

एकमत ऑनलाईन

पुणे : भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर ६६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताचे प्रसिद्ध कृष्णन आणि शार्दुल ठाकूर हे युवा वेगवान गोलंदाज विजयाचे शिल्पकार ठरले. कारण या दोघांनी प्रत्येकी तीन विकेट्स मिळवत इंग्लंडचे कंबरडे मोडले आणि संघाला विजय मिळवून दिला, तर भुवनेश्वर कुमारने २ बळी मिळवत त्यांना चांगली साथ दिली. भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडपुढे ३१८ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान इंग्लंडला यशस्वीरीत्या पेलवता आले नाही.

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी १३५ धावांची सलामी देत संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. पण त्यानंतर प्रसिधने पदार्पणात भारताला पहिले यश मिळवून दिले. प्रसिधने यावेळी जेसन रॉयला ४६ धावांवर बाद केले आणि इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर प्रसिधने बेन स्टोक्स आणि सॅम बिलिंग्स यांना माघारी धाडत ३ बळी मिळविले. युवा शार्दुलने स्थिरस्थावर झालेल्या बेअरस्टोला बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. बेअरस्टोने ९४ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्यानंतर शार्दुलने कर्णधार इऑन मॉर्गन आणि जोस बटलर यांचा काटा काढला आणि भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाला निर्धारित षटकांत सर्व गडी बाद २५१ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला.

तत्पूर्वी सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांच्या पाठोपाठ केएल राहुल आणि कृणाल पांड्या यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या वनडेत इंग्लंडला विजयासाठी ३१८ धावांचे आव्हान दिले होते. भारताकडून शिखर धवनने सर्वाधिक ९८ धावा केल्या. त्याचे शतक थोडक्यात हुकले. भारताच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी केली. सलामीच्या जोडीने अर्धशतकी भागिदारी केली. १६ व्या षटकात बेन स्टोक्सने रोहित शर्माला २८ धावांवर बाद केले. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने शिखरसोबत तिस-या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. ही जोडी चांगली खेळत असताना विराट कोहली ५६ धावा करून बाद झाला.

त्यानंतर शतकाजवळ पोहोचलेला शिखर ९८ धावांवर बाद झाला. त्याला बेन स्टोक्सने बाद केले, तर हार्दिक पांड्या १ धावाकरून माघारी परतला. हार्दिक बाद झाला तेव्हा भारताने ४०.३ षटकात २०५ धावा केल्या होत्या. त्यानंतर पदार्पणाचा सामना खेळणा-या कृणाल पांड्याने केएल राहुलसह अखेरच्या १० षटकांत फटकेबाजी केली आणि धावांचा वेग वाढवला. या दोघांनी ५६ चेंडूत १०० धावांची भागिदारी केली. भारताने अखेरच्या १० षटकात ११२ धावा केल्या. राहुलने ४३ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ६२ धावा केल्या, तर कृणालने ३१ चेंडूत ५८ धावा केल्या. यात ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. या दोघांच्या फटकेबाजीमुळे इंग्लंडसमोर मोठे आव्हान उभा करता आले.

६००० किमी प्रवास करत पुण्यातील महिलेचे वर्ल्ड रेकॉर्ड

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या