रिषभ पंतचा भारताला धक्का,
रोहित शर्मासह तिघे माघारी
लिसेस्टरशायर : भारतीय संघाच्या इंग्लंड दौ-याला आजपासून ख-या अर्थाने सुरुवात झाली. लिसेस्टरशायर क्लब विरुद्ध भारत असा चार दिवसीय सराव सामना आजपासून सुरू झाला आहे.
१ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणा-या कसोटी सामन्यासाठी भारतीय खेळाडूंना सराव मिळावा याकरिता लिसेस्टरशायर क्लबविरुद्ध सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु दोन्ही सलामीवीर ५० धावांत माघारी परतले. भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंत याने सुरेख झेल घेत टीम इंडियाला पहिला धक्का दिला.
लोकेश राहुलने दुखापतीमुळे माघार घेतल्याने शुबमन गिलचे इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत सलामीला खेळणे पक्के झाले आहे. आजही तो रोहितसह सलामीला आला. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा सुरेख सामना करताना गिलने काही चांगले फटकेही मारले. पण, १०व्या षटकात गिल व शर्मा यांची ३५ धावांची भागीदारी संपुष्टात आली. विल डेव्हिसच्या गोलंदाजीवर रिषभने यष्टिमागे सुरेख झेल टिपला अन् गिल २१ धावांवर बाद झाला. त्यानंतर १६व्या आणि १८ व्या षटकात भारताचे दोन फलंदाज रोमन वॉकरने माघारी पाठवले.
पुल शॉट मारण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा २५ धावांवर बाद झाला, तर हनुमा विहारीनेही ३ धावांवर विकेट टाकली. भारताची अवस्था ३ बाद ५४ अशी झाली. प्रसिद्ध कृष्णाने भारताला चौथा धक्का देताना श्रेयस अय्यरला भोपळ्यावर तंबूत धाडले. भारताचे ४ फलंदाज ५५ धावांवर तंबूत परतले.
रिषभ, जसप्रीत प्रतिस्पर्धींच्या संघात कसे?
४ दिवसीय सराव सामन्यात दोन्ही संघांकडून १३-१३ खेळाडू खेळणार आहेत. सराव सामना एकच असल्याने भारताच्या चमूतील सर्व खेळाडूंना खेळता यावे यासाठी काही खेळाडू लिसेस्टरशायर क्लबकडून खेळत आहेत. लिसेस्टरशायर काऊंटी क्रिकेट क्लबने (एलसीसीसी) आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सराव सामन्यासाठी भारतीय संघाचे स्वागत करतो. टीम इंडियाचा स्टार खेळाडू चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा आमच्या क्लबकडून खेळतील. या चार खेळाडूंना या क्लबकडून खेळण्यासाठी क्लब, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि इंग्लिश बोर्ड यांची संमती मिळाली आहे.