कसोटी सामना व्हावा तर असा. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या तीन कसोटी एकतर्फी झाल्या. नागपूर, दिल्ली, इंदूर कसोटी अडीच ते तीन दिवसांतच संपल्या. खरेतर अशी खेळपट्टी कोणत्याही आयोजकांनी करणे चुकीचे, कारण प्रेक्षक पाच दिवसांची कसोटी पाहायला आलेले असतात आणि तिस-या दिवशी सामन्याचा निकाल लागला तर त्यांची चांगलीच निराशा होते.
चौथ्या अहमदाबाद कसोटीत मात्र खेळपट्टी फलंदाजीला पोषक होती त्यामुळे या सामन्याचा निकाल लागणे अवघडच होते, त्यामुळेच टीम इंडियाची अंतिम सामन्यात दुस-यांदा निवड होईल की नाही याची रसिकांना शाश्वती नव्हती. पण न्यूझिलंडने केन विलियम्सनच्या तुफानी खेळीच्या जोरावर मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकन संघाला पराभूत केले.
पराभवानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी श्रीलंका संघ अपात्र ठरला. न्यूझिलंडने मिळवलेला हा विजय मुळीच सोपा नव्हता, पण अखेरच्या चेंडूपर्यंत प्रयत्न करून विजय मिळवलाच. शेवटच्या चेंडूवर विलियम्सन धावबाद होता होता वाचला. पहिल्या कसोटीदरम्यान ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळाली. पाचव्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर न्यूझिलंडला विजयासाठी एक धाव आवश्यक होती. यावेळी केन विलियम्सन खेळपट्टीवर होता. असिथा फर्नांडोने या षटकातील शेवटचा चेंडू बाऊन्सर टाकला.
विलियम्सनने हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केला, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू बॅटला लागला नाही हे समजताच विलियम्सन एक धाव घेण्यासाठी धावत सुटला. यष्टिरक्षक निरोशन डिकवेला याने हा चेंडू हातात आल्यानंतर क्षणाचा विलंब न करता थेट स्टम्प्सवर फेकून मारला. पण चेंडू स्टम्प्सला लागला नाही आणि गोलंदाजाच्या हातात आला.
गोलंदाज फर्नांडोने देखील चेंडू हातात आल्यानंतर तत्काळ नॉन स्ट्राईक एंडवर फेकून मारला. यावेळी चेंडू स्टम्प्सला लागला आणि पंचांनी निकाल जाहीर करण्याआधी तिस-या पंचांची मदत घेतली. तिस-या पंचांनी रिव् ू पाहिल्यानंतर विलियम्सन चेंडू स्टम्प्सला
लागण्याआधी स्ट्राईकच्या आतमध्ये पोहोचल्याचे दिसले. परिणामी तिस-या पंचांनी नाबाद दिला आणि न्यूझिलंडने विजय मिळवला. केन विलियम्सनने या सामन्यातील दुस-या डावात १९४ चेंडूंत नाबाद १२१ धावा केल्या.
यात ११ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. कसोटी कारकीर्दीतील विलियम्सनचे २७वे तर आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील ४०वे शतक ठरले. उभय संघांतील या सामन्याचा विचार केला तर पहिल्या डावात श्रीलंकेने ३५५ तर न्यूझिलंडने ३७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात दुस-या डावात श्रीलंकेने ३०२ तर न्यूझिलंडने ८ बाद २५८ धावा करत विजय मिळवला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेवर या सामन्याचा मोठा परिणाम झाला. भारताने डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात जागा पक्की केली.
- डॉ. राजेंद्र भस्मे
कोल्हापूर, मोबा. ९४२२४ १९४२८