19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeक्रीडाटीम इंडियाचा धमाकेदार विजय

टीम इंडियाचा धमाकेदार विजय

एकमत ऑनलाईन

कॅनबेरा : भारताने तिस-या एकदिवसीय सामन्यात आपली लाज राखली. तिस-या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारताला गेल्या सहा सामन्यांमध्ये मिळालेला हा पहिला विजय आहे. भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ३०३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अ‍ॅरॉन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतके झळकावली, पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. भारताने या सामन्यात १३ धावांनी विजय मिळवला. भातीय संघाचा ऑस्ट्रेलियाच्या दौ-यातील हा पहिला विजय आहे.

भारताच्या ३०३ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला तो पदार्पण करणा-या टी. नटराजनने. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मार्नस लॅबुशेनला नटराजनने बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाला यावेळी सर्वांत मोठा धक्का दिला तो या सामन्यात प्रथम खेळणारा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने. या संधीचे सोने शार्दुलने केले आहे. कारण भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या स्टीव्हन स्मिथला शार्दुलने फक्त सात धावांवर बाद केले आहे. यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये स्मिथने शतके झळकावली होती. त्यामुळे शार्दुलने यावेळी भारताला मोठे यश मिळवून दिले.

ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज झटपट बाद झाले असले तरी कर्णधार अ‍ॅरॉन फिंच मात्र चांगली फलंदाजी करत होता. फिंचने यावेळी आपले अर्धशतक झळकावले आणि तो शतकाच्या दिशेने कूच करत होता. पण अष्टपैलू रवींद्र जडेजाने यावेळी फिंचला शिखर धवनकरवी झेलबाद केले आणि ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. फिंचने या सामन्यात सात चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ७५ धावा केल्या.

फिंच बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल हा खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता. मॅक्सवेलने यावेळी यष्टीरक्षक अ‍ॅलेक्स कॅरीबरोबर सहाव्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी रचली. पण कोहलीने यावेळी कॅरीला ३८ धावांवर असताना धावचीत करत ही जोडी फोडली. पण त्यानंतरही मॅक्सवेल हा दमदार फलंदाजी करत होता.

भारताने नाणेफेक जिंकत या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिस-या वनडे लढतीत भारताने प्रथम फलंदाजी करत ५ बाद ३०२ धावा केल्या. भारताकडून कर्णधार विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतकी खेळी केली. भारतीय फलंदाजांना या सामन्यात काही विशेष प्रभाव टाकता आला नाही. या सामन्यात भारताची अवस्था ४ बाद १२३ अशी होती. पण एका पाठोपाठ एक विकेट पडत असताना एका बाजूने विराटने संयमी फलंदाजी सुरू ठेवली होती. या सामन्यात त्याने २३वी धाव पूर्ण करत वनडे क्रिकेटमध्ये सर्वांत वेगाने १२ हजार धावा पूर्ण केल्या. त्याने सचिन तेंडुलकरचा ३०० डावांत १२ हजार धावांचा विक्रम मोडला. विराट मोठी खेळी करेल असे वाटत असताना जोश हेजलवुडने त्याला ६३ धावांवर बाद केले. या मालिकेत हेजलवुडने त्याला तिस-यांदा बाद केले.

विराट बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी संघाला ३०२ धावांपर्यंत मजल मारून दिली. हार्दिकने मालिकेतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या पाठोपाठ जडेजाने देखील अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. त्यांनी नाबाद १५० धावांची भागिदारी केली. भारताकडून सहाव्या विकेटसाठी झालेली ही तिस-या क्रमांकाची भागिदारी ठरली. हार्दिकने ७६ चेंडूत १ षटकार आणि ७ चौकारांसह नाबाद ९६ तर रवींद्र जडेजाने ५० चेंडूंत ३ षटकार आणि ५ चौकारांसह नाबाद ६६ धावा केल्या.

शौविक चक्रवर्तीला जामीन मंजूर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या