नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या आगामी नवीन टी-२० लीगचा पहिला हंगाम पुढील वर्षी जानेवारीमध्ये आयोजित केला जाणार आहे. वृत्तानुसार, इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझीने क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या नवीन टी-२० लीगमधील सर्व सहा संघ विकत घेतले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनौ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांपैकी एकाने टीम लिलावादरम्यान फ्रँचायझीसाठी यशस्वी बोली लावली.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, सीएसकेने चेन्नई सुपर किंग्ज स्पोर्टस् लिमिटेड या मूळ कंपनीमार्फत जोहान्सबर्ग फ्रँचायझी खरेदी करण्यासाठी सर्वाधिक बोली लावली होती.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीच्या मुंबई इंडियन्सने केपटाऊन फ्रँचायझी विकत घेतली, तर सनरायझर्सचे मालक सन टीव्ही ग्रुपने पोर्ट एलिझाबेथ फ्रँचायझी ताब्यात घेतली.
आरपी संजीव गोयंका ग्रुप, ज्याने गेल्या वर्षी लखनौ आयपीएल फ्रँचायझी विकत घेण्यासाठी ७०९० कोटी रुपयांची विक्रमी रक्कम दिली, डर्बन संघ निवडला, तर राजस्थान रॉयल्सने पार्ल संघ विकत घेतला. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे सह-मालक पार्थ जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील जिंदाल साऊथ वेस्ट स्पोर्टस्ने प्रिटोरियाचा ताबा घेतला आहे.
ही लीग क्रिकेट दक्षिण आफ्रिकेद्वारे टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर सुपरस्पोर्टच्या भागीदारीत चालवली जाईल. पेपरवर्क पूर्ण झाल्यानंतर बोर्डाने नवीन मालकांची आणि ते प्रतिनिधित्व करतील त्या शहरांची औपचारिक घोषणा करणे अपेक्षित आहे.
उल्लेखनीय म्हणजे, विविध कारणांमुळे ग्लोबल लीग टी-२० आणि झांसी सुपर लीगमध्ये अपयशी ठरल्यानंतर ही नवीन स्पर्धा कायमस्वरूपी फ्रँचायझी-आधारित टी-२० लीग सुरू करण्याचा सीएसएचा तिसरा प्रयत्न आहे.
दरम्यान, याआधीही अनेक आयपीएल फ्रँचायझी मालकांनी इतर टी-२० लीगमधील संघ विकत घेतल्याची माहिती आहे. यामध्ये नुकतीच कोलकाता नाईट रायडर्सचा सहमालक शाहरूख खान याने कॅरिबियन महिला क्रिकेट लीगमध्ये महिलांचा संघ विकत घेतला आहे. याची माहिती त्याने स्वत: त्याच्या सोशल मीडियावरून प्रसारित केली होती.