सिडनी : जखमी हनुमा विहारी आणि आर अश्विन या दोघांनी केलेल्या बचावात्मक फलंदाजीमुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसरा कसोटी सामना ड्रॉ करण्यात यश मिळवले. पाचव्या दिवशी भारती संघाला विजयासाठी ३०९ धावांची गरज होती. ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांच्या भागिदारीने भारताच्या विजयाची आशा निर्माण केली होती. पण ही जोडी बाद झाल्यानंतर हनुमा विहारी आणि आर अश्विन यांनी साडेतीन तासाहून अधिक वेळ आणि २५० हून अधिक चेंडू खेळून सामना वाचवला. तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाल्याने चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा स्थितीत आहेत.
पाचव्या दिवशी भारताने कालच्या २ बाद ९८ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. मैदानावर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे फलंदाज होते. कालच्या धावसंख्येत सहा धावांची भर टाकल्यानंतर भारताला मोठा धक्का बसला. कर्णधार रहाणे ४ धावा करून बाद झाला. त्यानंतर हनुमा विहारीच्या आधी ऋषभ पंत फलंदाजीला आला.पंतने पुजारासह चौथ्या विकेटसाठी १४८ धावांची भागिदारी केली. पंत आणि पुजाराने पहिल्या सत्रात भारताचे पारडे जड केले. दुस-या सत्रात पंत शतकाच्या जवळ आल्यावर बाद झाला. लायनने ९७ धावांवर त्याची विकेट घेतली. त्याने ११८ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकारासह ९७ धावा केल्या.
पंत बाद झाल्यानंतर पुजाराने अर्धशतक पूर्ण केले. जोश हेजलवुडने पुजाराची बोल्ड काढली. पुजारा ७७ धावांवर बाद झाला. भारताची अव्सथा ५ बाद २७२ होती आणि मैदानावर हनुमा विहारी- आर अश्विन ही जोडी होती. सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पाच विकेट तर भारताला १३७ धावांची गरज होती. अशात विहारीला दुखापत झाली. विराहीला वेगाने धावा काढता येत नसल्याने या दोन्ही फलंदाजांनी बचाव तंत्र वापरले. भारताला ३० षटकात विजयासाठी ११८ धावांची गरज होती. पण फलंदाजी करणारे हे अखेरची फलंदाज असल्याने भारताने विजया पेक्षा सामना वाचवण्याकडे भर दिला. या दोघांनी साडेतीन तास आणि २५० हून अधिक चेंडू खेळले आणि सामना वाचवला. भारताने दुस-या डावात ५ बाद ३२४ धावा केल्या. विहारीने १६१ चेंडूत नाबाद २३ तर आर अश्विनने १२८ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या.