24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeक्रीडाविराटची ८५ धावांची खेळी व्यर्थ

विराटची ८५ धावांची खेळी व्यर्थ

एकमत ऑनलाईन

सिडनी : अखेरच्या टी-२० सामन्यात १२ धावांनी बाजी मारत कांगारूंनी टी-२० मालिकेचा शेवट गोड केला आहे. १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने ८५ धावांची आक्रमक खेळी केली. परंतु दुस-या बाजूने इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने भारताला पराभवाचा सामना करावा लागला. १८७ धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. ग्लेन मॅक्सवेल टाकत असलेल्या पहिल्याच षटकात लोकेश राहुल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीने दुस-या संघाचा डाव सावरला.

ही जोडी भारताचा डाव सावरणार असे वाटत असतानाच स्वेप्सनने शिखर धवनला माघारी धाडले. यानंतर संजू सॅमसननेही निराशाजनक खेळी केली़ श्रेयस अय्यरही शून्यावर बाद झाला. यानंतर विराटने हार्दिक पांड्याच्या साथीने फटकेबाजी करत भारताचे आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला. परंतु कर्णधार फिंचने आपला हक्काचा फिरकीपटू झॅम्पाला पाचारण केले आणि १८ व्या षटकात पांड्याचा बळी घेत झॅम्पानेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. १९ व्या षटकात अँड्र्यू टायने विराटला माघारी धाडत भारताच्या उरल्यासुरल्या आशांवर पाणी फिरवले.

त्याआधी, यष्टिरक्षक मॅथ्यू वेड आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी झळकावलेल्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अखेरच्या टी-२० सामन्यात १८६ धावांचा डोंगर उभा केला. वेड आणि मॅक्सवेल जोडीने भारतीय गोलंदाजांची धुलाई करत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. वेडने ८० तर मॅक्सवेलने ५४ धावांची खेळी केली. नाणेफेक जिंकत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत सुरुवातीच्या षटकांमध्ये भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर अंकुश लावला. पुनरागमन करणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच सुंदरच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता माघारी परतला. यानंतर मॅथ्यू वेड आणि स्टिव्ह स्मिथ यांनी दुस-या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. सुंदरने स्टिव्ह स्मिथचा त्रिफळा उडवत भारताला दुसरे यश मिळवून दिले, स्मिथने २४ धावा केल्या.

मैदानात जम बसल्यानंतर भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत वेडने सिडनीच्या मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. वेड आणि मॅक्सवेल जोडीने तिस-या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. दरम्यान शार्दुल ठाकूरने वेडला तर नटराजनने मॅक्सवेलला माघारी धाडत कांगारूंची जोडी फोडली. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने २ तर नटराजन आणि शार्दुलने १-१ बळी घेतला.

‘इएसआयसी’ग्राहकांना दिलासा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या