लखनौ : लखनोचे सलामीवीर कायल मेयर्स आणि के. एल. राहुल यांनी सुरुवात चांगली केली. मात्र सनरायजर्स हैदराबादच्या फझलहक फारूकीने सलामीवीर मेयर्सला १३ धावांवर बाद करत लखनोला पहिला धक्का दिला. त्यावेळी सनरायजर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारनने आनंदात उडी मारली. परंतु त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही.
दरम्यान, लखनो सुपर जायंट्सने सनरायजर्सला १२१ धावांत रोखल्यावर ते सामना सहज जिंकतील असे वाटले होते. या विकेटनंतर लो स्कोअरिंग मॅच टाईट होईल असे वाटत होते. याच आनंदात काव्या मारनने आनंदाने उडी मारली. तिचा हा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मेयर्सनंतर आलेला दीपक हुडा देखील ७ धावांची भर घालून परतला. त्यामुळे तर काव्याच्या मनात विजयाचे लड्डू फुटले असतील.
मात्र या सगळ्या आनंदावर लखनो सुपर जायंट्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याने पाणी फेरले. गोलंदाजीत १८ धावांत तीन बळी टिपणा-या कृणालला फलंदाजीत देखील बढती मिळाली. याचा फायदा उचलत कृणालने २३ चेंडूंत आक्रमक ३४ धावांची खेळी केली. त्याने के. एल. राहुलसोबत तिस-या विकेटसाठी ५५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत संघाला शंभरी पार करून दिली. याचबरोबर हैदराबादच्या बाऊन्स बॅकचे सर्व दरवाजे त्याने बंद करून टाकले.