नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी सलामीवीर वासिम जाफर मोठ्या वादात सापडला आहे. वासिम जाफरने उत्तराखंड क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहताना, धर्म पाहून खेळाडूंची नियुक्ती केल्याचा आरोप होत आहे. मात्र या आरोपानंतर वासिम जाफर कमालीचा नाराज झाला आहे. त्याने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
वासिम जाफरने ९ फेब्रुवारीला उत्तराखंड क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. मात्र याच संघाने जाफरवर धार्मिक सहानुभूती दाखवल्याचा, संघनिवडीदरम्यान मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप केला आहे. उत्तराखंड क्रिकेट संघाचे सचिव माहिम वर्मा यांनी हा आरोप केला आहे. इतकेच नाही तर वासिम जाफरने संघातील खेळाडूंना ‘जय श्रीराम’ आणि ‘जय हनुमान’च्या घोषणा देण्यापासूनही रोखल्याचा आरोप आहे. मात्र हे सर्व आरोप जाफरने फेटाळले आहेत.
माहिम वर्मांचा आरोप काय?
माहिम वर्मांच्या आरोपानुसार, ‘‘मंगळवारी काही खेळाडू माझ्याकडे आले, त्यांनी जे सांगितले ते हैराण करणारे होते. जाफर टीममध्ये धार्मिकीकरण करत सल्याचे खेळाडूंचे म्हणणे होते़ काही खेळाडू ‘रामभक्त हनुमान की जय’ ही घोषणा देऊ इच्छित होते. मात्र जाफरने त्यांना रोखले़ इतकेच नाही तर काही दिवसांनी बायो-बबल ट्रेनिंगमध्ये एक मौलवी आले आणि त्यांनी मैदानात दोनवेळा नमाज पठण केले. मात्र या ट्रेनिंगमध्ये एक मौलवी प्रवेशच कसे करू शकतात? मी खेळाडूंना आपल्याला आधी का सांगितले नाही असा प्रश्न केला.’’
माझ्यावरील आरोप निराधार : जाफर
दरम्यान, वासिम जाफरने आपल्यावरील आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. जाफर म्हणाला, ‘‘सर्वांत आधी मला हे स्पष्ट करायचे आहे की, ‘रामभक्त हनुमान की जय’ ही घोषणा कधीच दिली गेली नाही. जेव्हा आम्ही प्रॅक्टिस मॅच खेळत होतो, तेव्हा खेळाडू ‘राणी माता सच्चे दरबार की जय’ अशी घोषणा देत होते. मी कधीच त्यांना जय हनुमान किंवा जय श्रीरामचा नारा देताना पाहिले नाही. तो एक शीख धर्मियांचा नारा होता. टीममधील दोन शीख खेळाडू ही घोषणा देत होते.
आपण धर्मासाठी नव्हे, उत्तराखंडसाठी खेळतो
जाफर म्हणाला, ‘‘ज्यावेळी आम्ही बडोद्याला पोहोचलो, त्यावेळी मी खेळाडूंना सांगितले, आम्ही एका धर्मासाठी नाही तर उत्तराखंडसाठी खेळत आहोत. त्यामुळे आपली घोषणा उत्तराखंडसाठी हवी. आपली घोषणा, ‘‘गो उत्तराखंड, लेट्स डू इट उत्तराखंड आणि कमआॅन उत्तराखंड’’ अशी हवी. जर मला धर्मालाच प्रमोट करायचे असते, प्रसार किंवा प्रचार करायचा असता तर मी अल्लाह-हू-अकबरचा नारा द्यायला सांगितले असते. त्यामुळे माझ्यावरील धार्मिक आरोप चुकीचा आहे.’’
पंढरपूर शहरात प्रवेश करताच खड्ड्यांनी स्वागत