नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध १ जुलैपासून सुरू होणा-या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी आली आहे. सराव सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्मा कोविड १९ च्या रॅपिड अँटीजेन चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे. कर्णधार रोहित शर्मा सध्या हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीपूर्वी रोहित फिट झाला नाही तर टीम इंडियाला मोठा झटका बसू शकतो.
पहिल्यांदाच परदेशात कसोटीचे कर्णधारपद भूषवणारा रोहित या कसोटीतून बाहेर पडला तर संघाचे नेतृत्व कोण करणार हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. सलामीवीर के. एल. राहुलही दुखापतीमुळे कसोटी संघाबाहेर आहे, अन्यथा त्याच्याकडे कर्णधारपद दिले असते.
दक्षिण आफ्रिका दौ-यात राहुल जखमी झाल्यानंतर पंतने भारतीय संघाची धुरा सांभाळली होती. इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी के. एल. राहुलला उपकर्णधार बनवण्यात आले होते. पण कंबरेच्या दुखापतीमुळे तो केवळ या कसोटीतूनच नाही तर इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतूनही बाहेर पडला आहे. अशा स्थितीत कर्णधार आणि उपकर्णधार या दोघांच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचे नेतृत्व कोण करणार?