नवी दिल्ली : बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि पीसीबीचे चेअरमन नजम सेठी यांची शनिवारी बहरीनमध्ये आशिया कप २०२३ संदर्भात पहिली औपचारिक बैठक झाली. यंदाचा आशिया चषक पाकिस्तानात होणार होता, मात्र भारताने नकार दिल्यानंतर ही बैठक पार पडली.
या बैठकीनंतर आशियाई क्रिकेट परिषद मार्चमध्ये आशिया चषक एकदिवसीय स्पर्धेसाठी पर्यायी ठिकाण ठरवेल. या बैठकीत अद्याप कोणताही मोठा निर्णय झालेला नाही. मात्र भारत पाकिस्तानमध्ये न जाण्यावर ठाम आहे.
आशिया चषक सप्टेंबरमध्ये होणार आहे, ज्याचे यजमानपद पाकिस्तानमध्ये आहे. पण आशिया कपचे यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावून घेणे जवळपास निश्चित झाले आहे. मार्चमध्ये होणा-या पुढील बैठकीत आशिया कप स्थलांतरित करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. यावेळी आशिया कप यूएईमध्ये होऊ शकतो. श्रीलंका हाही पर्याय आहे, पण यूएईचा दावा मजबूत आहे.
बीसीसीआय भारतीय संघाला पाकिस्तान दौ-यावर न पाठवण्याच्या निर्णयावर ठाम आहे. अशा स्थितीत पाकिस्तानला आशिया चषकाचा हट्ट सोडावा लागणार आहे.
दरम्यान, नुकत्याच बहरीनमध्ये झालेल्या एशियन क्रिकेट कॉन्सिलच्या बैठकीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नजम सेठी आणि बीसीसीआय सचिव जय शहा यांच्यात जबरदस्त खडाजंगी झाल्याचे समजते.
एका एसीसी अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार बैठकीत तू-तू मैं-मैं झाल्याने शहा आणि सेठी यांच्यातील वातावरण चांगलेच तापले होते. नजम सेठी हे जय शहा यांच्याशी उर्मटपणे बोलत होते. ते पाकिस्तानचा संघ वर्ल्डकपसाठी भारतात येणार नाही अशी धमकी देत होते.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
बैठकीवेळी बीसीसीआयने स्पष्ट केले की, आमचे सरकार पाकिस्तानात संघ पाठवण्यास परवानगी देणार नाही. बीसीसीआयला त्रयस्थ ठिकाणी पाकिस्तानशी खेळण्यात कोणतीच अडचण नाही. जर पाकिस्तान त्रयस्थ ठिकाणी आशिया कप आयोजित करण्यास तयार झाले तर स्पर्धा अबु धाबी, दुबई आणि शारजाहमध्ये आयोजित करण्यात येईल. पीसीबीने एसीसीला सांगितले की आशिया कप पाकिस्तानमधून बाहेर हलवण्याबाबत आम्हाला पाकिस्तान सरकारसोबत याबाबत बोलून त्यांची परवानगी घ्यावी लागेल.