33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home क्रीडा व्वा..टीम इंडिया...व्वा! कम्माल केली!!

व्वा..टीम इंडिया…व्वा! कम्माल केली!!

एकमत ऑनलाईन

कम्माल…अफलातून…अविश्वसनीय!! हेच शब्द भारतीय संघाच्या आॕस्ट्रेलियातील (India Vs Australia) कामगिरीचे वर्णन करु शकतील कारण ज्या संघाकडे धड अकरा फिट खेळाडूसुध्दा जमवायची मारामार होती त्याने आॕस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर चारी मुंड्या चीत केले आणि कसोटीमालिका अविश्वसनीयरित्या २-१अशी जिंकली. यासह अॕडिलेडमधील घसरगुंडीनंतर ही मालिका भारत ४-० अशी गमावेल अशा वल्गना करणारांना अजिंक्य रहाणेच्या टीम इंडियाने तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. भारताने सामना तीन गडी राखून जिंकला. आणि यासह जागतिक क्रमवारीतही आपण अव्वल स्थानी पोहोचलो आणि आॕस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी घसरले.

कोहली, शामी, बुमरा, अश्विन, जडेजा, विहारी, यादव हे नसले तरी काही फरक नाही, फक्त १३ विकेट नावावर असणाऱ्या गोरंदाजांच्या संघाविरुध्द १०४६ विकेट काढणारे गोलंदाज असले तरी काही फरक पडत नाही, जिद्द आणि इच्छा असली तर काहीही शक्य आहे हेच अजिंक्य रहाणे आणि टीमने दाखवून दिले. भारताच्या या विजयाने आॕस्ट्रेलियाला केवळ जागतिक क्रमवारीतच तिसऱ्या स्थानी ढकलले असे नाही तर २००८ पासून सलग नऊ मालिका आणि सलग १६ कसोटी सामने जिंकण्याचा त्यांचा विक्रम धुळीस मिळवला. ब्रिस्बेनच्या मैदानावर गेल्या ३१सामन्यांत आॕस्ट्रेलियन हरलेले नव्हते, १९८८ पासुनची त्यांची या मैदानावरची ही कामगिरीसुध्दा जिद्दी आणि लढावू भारतीय संघाला रोखू शकली नाही.

ब्रिस्बेनच्या मैदानावर कोणत्याही संघाने चौथ्या डावात ३०० धावा केलेल्या नव्हत्या पण भारतीय संघाने आज ७बाद ३२९ धावा केल्या. याचे श्रेय शुभमन गीलच्या९१, चेतेश्वर पूजाराच्या५६ आणि रिषभ पंतच्या ८९धावांना… शिवाय सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात पंत व वाॕशिंग्टन सुंदर (२२) यांनी केलेली सहाव्या गड्याची ५३👌धावांची भागिदारीसुध्दा महत्वाची ठरली.

त्यामुळे वुलन गाबाच्या खेळपट्टीवर शेवटच्या डावात तीनशे च्या वर धावा होवू शकत नाही हा भ्रम असल्याचे टीम इंडियाने सिध्द केले आणि सामन्याच्या शेवटच्या दिवशी विजयासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या संघात भारतीय संघ चौथ्या स्थानी जाऊन बसला. टीम इंडियाने आज ३२९ धावा केल्या. यापेक्षा अधिक धावा आॕस्ट्रेलियाने४०४ (वि. इंग्लंड १९४८), वेस्ट इंडीजने ३४८ (वि. न्यूझीलंड १९६९) आणि वेस्ट इंडिजनेच ३४४ (वि. इंग्लंड १९८४) केलेल्या होत्या. आॕस्ट्रेलियात सामना जिंकण्यासाठी यशस्वी पाठलाग केलेली ही तिसरी मोठी (७ /३२७ )धावसंख्या ठरली.२००८ मध्ये दक्षिण आफ्रिकेने४१४धावा केल्या होत्या आणि १९२८ मध्ये इंग्लंडने ३३२ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताच्या आजच्या ७बाद ३२९धावा.

शेवटच्या दिवशी भारतासाठी ठरल्याप्रमाणेच घडून आले. पुजाराने नेहमीप्रमाणेच नांगर टाकून अर्धा दिवस खेळुन काढला. शुभमान गील व रिषभ पंत यांनी आवश्यक धावगती कायम ठेवली. नंतर वाॕशिंग्टन सुंदरने पंतला अतिशय मोलाची साथ दिली आणि भारताने जादू घडवली. ९७ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर हेजलवूडला रिषभ पंतने चौकार लगावला आणि डेव्हिड आणि गोलियथच्या या लढाईत डेव्हीड असलेला भारतीय संघ जिंकला. येणारी बरीच वर्षे कुणीही हा विजय आणि ही मालिका विसरु शकणार नाही कारण १९८३ नंतर भारतीय संघाने पहिल्यांदाच असा चमत्कार केला आहे.

गृहिणींच्या श्रमांचे अवमूल्यन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या