मुंबई : प्रतिनिधी
भाजपाने मुंबई महापालिकेच्या प्रचारासाठी तयार केलेले प्रचारगीत निवडणूक आयोगाने नाकारले आहे. या गीतातील भगवा या शब्दाला निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे.यामुळे भाजपाचा तिळपापड झाला असून, धर्मनिरपेक्ष निवडणूक आयोग रंगनिरपेक्षही असायला हवा, निवडणूक आयोगाला भगव्याच वावडे का? असा सवाल भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.
भाजपाने मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी एक गीत तयार केले आहे. अवधुत गुप्ते आणि वैशाली सामंत या प्रख्यात गायकांनी ते गायले आहे. मात्र या गीतात वापरलेल्या भगवा या शब्दाला आक्षेप घेत निवडणूक आयोगाने हे गीत नाकारले आहे. यामुळे भाजपाची प्रचाराच्या ऐन तोंडावर अडचण निर्माण झाली आहे. आता प्रचारासाठी नवीन गीत तयार करावे लागणार आहे.
आयोग रंगनिरपेक्ष असायला हवा : केशव उपाध्ये
निवडणूक आयोगाला भगव्याचे वावडे का ? असा सवाल भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. कुणी हिरव्या रानात अशी ओळ केली असती तर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला असता का? मग भगवा शब्द वापरला म्हणून भाजपाचे प्रचार गीताला परवानगी नाकारली? श्रीराम या शब्दालाही आक्षेप घेण्यात आला आहे. भगवा व श्रीराम या देशाची ओळख आहे ती कुणाची कॉपीराईट नाही. हा उबाठासह इतर पक्षांना भगवा व श्रीरामाचे वावडे आहे त्याला आम्ही काय करणार? गीताला परवानगी नाकाराल पण सकाळी दिसणारा आकाशातील भगवा आणि लोकांच्या मनातील श्रीराम कसा नाकारणार? असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला आहे.

