मुंबई : प्रतिनिधी
नैऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) राज्यातून पूर्णपणे माघार घेताच महाराष्ट्रातील वातावरणात अचानक आणि नाट्यमय बदल झाला आहे. पावसाळा संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच मुंबईसह संपूर्ण राज्याला ‘ऑक्टोबर हिट’च्या अस झळा बसू लागल्या आहेत. प्रचंड उकाडा आणि वाढला आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील तापमानात आणखी वाढ होणार आहे. येत्या ४८ तासांत राज्यातील काही भागांतील तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने आणि त्यानंतरच्या दिवसांत पुन्हा १ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ नोंदवली जाण्याचा अंदाज आहे. दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून, उत्तर कोकणात प्रचंड उकाडा आणि घामाघूम करणारे दमट हवामान नागरिकांची परीक्षा घेईल. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान सरासरी ३७ ते ३९ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्याची राजधानी मुंबईत पावसाळा संपल्यानंतर उष्णतेने रौद्ररूप धारण केले आहे. गुरुवारी मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान तब्बल ३७.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हे तापमान सरासरी तापमानापेक्षा ४.५ अंशांनी अधिक असल्याने हवामान विभागाने मुंबई आणि शेजारील रायगड जिल्ह्यासाठी उष्णतेचा विशेष इशारा जारी केला आहे. 3 ऑक्टोबर रोजी मोसमी पावसाने माघार घेतल्यानंतर शहरातील तापमानाचा आलेख वेगाने वर चढत आहे.
विदर्भात उन्हाचे चटके; पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावा
विदर्भात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून तापमान सातत्याने ३५ ते ३६ अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात आहे. विदर्भातील ग्रामीण आणि शहरी भागांत दुपारच्या सुमारास तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. कडक ऊन आणि कोरड्या हवामानामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले असून, पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.
वाढलेल्या उष्म्यामुळे आरोग्य धोक्यात
हवामानातील या तीव्र बदलामुळे विषाणूजन्य आजार, डिहायड्रेशन (पाण्याची कमतरता), चक्कर येणे आणि उष्माघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना खालील खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तहान लागलेली नसली तरीही शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी, लिंबू पाणी, ताक आणि नारळ पाणी प्यावे. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत थेट कडक उन्हात अनावश्यक फिरणे टाळावे. बाहेर पडताना हलक्या रंगाचे, सैल आणि सुती कपडे वापरावेत; डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. तीव्र डोकेदुखी, उलट्या किंवा थकवा जाणवल्यास घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
















