नांदेड : प्रतिनिधी
नीट पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाही करावी, नांदेड शहरातील इतरही कोचिंग क्लासेस चालकांची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आज २० मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
नीट परीक्षा पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. तर सामाजिक आणि विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांची सखोल चौकशी करून राजीनामा घ्यावा, मोटेगावकर याच्यासह नांदेड शहरातील अन्य कोचिंग क्लासचालकांची चौकशी करून कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यास संबंधित दोषींना जबाबदार धरून कारवाई करावी, राधाकृष्ण समितीच्या अहवालातील कलम ६.१ नुसार नीट परीक्षा व्यवस्थापन करण्यात यावे, घोटाळ्यातील दोषी असलेल्या विद्यार्थ्यांना किमान ३ वर्षे नीट परीक्षेला बसण्यास बंदी घालावी या मागण्यासाठी २० मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थी कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आकाश सावते, कैलास वाघमारे, मोहम्मद जावेद, एमराज आढाव, देशमुख यांच्यासह इतर कृती समिती पदाधिकारी उपस्थित होते.
















