नांदेड : प्रतिनिधी
स्कुटीला पाठीमागून भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने एलएल.बी. द्वितीय वर्षात शिक्षण घेणा-या २० वर्षीय विद्यार्थिनीचा दुदैर्वी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. १) रोड क्रमांक २६ वर घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत विद्यार्थिनीचे नाव मानसी संजयकुमार जाधव (वय २०, रा. विष्णुनगर) असे आहे. मानसी ही नारायणराव चव्हाण लॉ कॉलेजमध्ये एलएल.बी.च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. मंगळवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी ती घरून स्कुटीवरून कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती. रोड क्रमांक २६ वरून जात असताना मागून आलेल्या एमएच २६ बीई ४१३६ क्रमांकाच्या कारने तिच्या स्कुटीला जोरदार धडक दिली.कारची धडक एवढी भीषण होती की मानसी रस्त्यावर कोसळली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती जागीच बेशुद्ध पडली. अपघाताची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गोपीनाथ फुलारी व ए. एल. वाघमारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी जखमी मानसीला तातडीने वजिराबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिका-यांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी तिचे पार्थिव विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. या प्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शिवाजीनगर पोलिसांकडून सुरू होती
















