पुणे : प्रतिनिधी
नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर येथील नामांकित आरसीसी क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकरला अटक केल्यानंतर आता त्याच्या मुलाची पुण्यात आज सीबीआयने चौकशी केली. त्यावेळी त्याच्या मदतीला ३ वकिलांचा ताफाही होता. त्यातच पुण्यात अनेक पालक आणि विद्यार्थ्यांना चौकशीसाठी बोलावलेले असतानाच लातुरातही सीबीआयचे पथक ठाण मांडून बसलेले असून, आज आरसीसी क्लासमधील आणखी २ विद्यार्थी, पालकांची चौकशी करण्यात आली.
यासोबतच नांदेडमधील पालक आणि विद्यार्थीही पुण्यात दाखल झाले आहे. त्यामुळे बड्या माशांचा फास आवळतानाच विद्यार्थी, पालकही चौकशीच्या फे-यात अडकले आहेत. दरम्यान, लातुरातील ७ ते ८ जण सीबीआयच्या रडारवर असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने लातूर शहरातील २ विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची मंगळवारी चौकशी केली. त्यांना अधिक चौकशीसाठी गुरुवारी पुणे कार्यालयात हजर राहण्यास सांगितल्याची खात्रीलायक माहिती आहे. सीबीआयचा लातुरातील मुक्काम आणखी वाढला आहे.
















