नवी दिल्ली : भांडवली बाजार नियामक सेबीने झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड (झील) कंपनीवर दोन महिन्यांसाठी भांडवली बाजारात सहभागी होण्यास बंदी घातली आहे. तसेच कंपनीचे चेअरमन एमेरिटस सुभाष चंद्रा आणि व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत गोयंका यांना एक वर्षासाठी बाजारातून प्रतिबंधित करण्यात आले आहे. हैदराबादमधील कंपनीची जमीन प्रमोटर समूहाशी संबंधित कंपन्यांच्या कर्जासाठी परवानगीशिवाय गहाण ठेवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
सेबीने तिघांवर एकूण १.४८ कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. त्यामध्ये झीलवर ३० लाख रुपये, सुभाष चंद्रा यांच्यावर ६० लाख रुपये आणि पुनीत गोयंका यांच्यावर ५८ लाख रुपयांचा दंड आहे. सेबीच्या आदेशानुसार, डिसेंबर २०१८ मध्ये झीलच्या हैदराबाद येथील मालमत्तेची मूळ कागदपत्रे इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडकडे एस्सेल समूहाशी संबंधित कंपन्यांनी घेतलेल्या कर्जाच्या हमीसाठी जमा करण्यात आली होती.
अहवालांमध्ये व्यवहाराचा योग्य खुलासा नाही
कर्जाच्या हमीसाठी जमा करण्यात आलेल्या मूळ कागदपत्रांसाठी लेखापरीक्षण समितीची पूर्वपरवानगी घेतली नव्हती व आर्थिक अहवालांमध्येही या व्यवहाराचा योग्य खुलासा केला नव्हता. सेबीने नमूद केले की, सुभाष चंद्रा यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कंपनीची मालमत्ता वैयक्तिक फायद्यासाठी धोक्यात घातली. हा आदेश तत्काळ लागू झाला असून दंडाची रक्कम ४५ दिवसांत भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
















