बिजींग : रीसस माकडाचे यशस्वी क्लोनिंग केल्याचा दावा चीनी वैज्ञानिकांनी केला. क्लोनिंगच्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं हे माकड आता दोन वर्षांचं झालं आहे. रेट्रो असं या माकडाचं नाव आहे.
१९९६ साली काही वैज्ञानिकांनी पहिल्यांदाच एका प्राण्याचा यशस्वी क्लोन तयार केला होता. डॉली नावाच्या एका बकरीचा क्लोन बनवण्यासाठी वैज्ञानिकांनी सोमॅटिक सेल न्यूक्लिअर ट्रान्सफर नावाच्या तंत्राचा वापर केला होता. यामध्ये थोडाफार बदल करून आता चीनच्या वैज्ञानिकांनी रेट्रो माकडाचा क्लोन बनवला आहे.
१९९६ नंतर जगभरातील वैज्ञानिकांनी सुमारे २० हून अधिक जनावरांचं क्लोनिंग केलं आहे. अगदी भारतात देखील २००९ साली एका म्हशीचं क्लोनिंग करण्यात वैज्ञानिकांना यश मिळालं होतं. मात्र, माकडाचं यशस्वी क्लोनिंग करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नेचर या नियतकालिकात याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.
नैतिकतेचा प्रश्न
या शोधाबाबत जगभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. स्पॅनिश नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी याठिकाणी कार्यरत असणारे लुईस मोंटोलियू यांनी याविषयीच्या नैतिकतेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणतात, की या प्रयोगामध्ये ११३ भ्रूणांपैकी केवळ एकच जिवंत राहिलं आणि एवढं मोठं झालं आहे. म्हणजे याचा सक्सेस रेट एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. लुईस हे चीनमधील संशोधनाचा भाग नव्हते.
अजून माकडाच्या एकाच प्रजातीचं क्लोनिंग झालं आहे. माणसांचं क्लोनिंग करण्यापूर्वी आपल्याला माकडांच्या आणखी प्रजातींचं क्लोनिंग करण्याची गरज आहे. अर्थात, माणसांचं क्लोनिंग हे गरजेचं नाही, तसंच ते अनैतिक देखील आहे. याचा प्रयत्न करणंही खूप अवघड असणार आहे… असं मत लुईस यांनी व्यक्त केलं.