यवतमाळ : राज्यात सध्या तापमानाचा पारा ४० ते ४५ अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना तीव्र उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आले असून, जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रचंड उष्णतेने गत ४८ तासांत ८ जणांचा बळी गेल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व मृत्यूंचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, दिग्रसमध्ये अवघ्या चोवीस तासांत तिघांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त यवतमाळच्या चापमनवाडी आणि भोसा मार्गावर दोघांचा, पुसदमध्ये दोघांचा, तर बाभूळगाव येथे एकाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. या आठ मृत व्यक्तींपैकी चौघांची ओळख पटली असून, उर्वरित चार जण अद्याप अज्ञात आहेत.
यातील काही घटना अत्यंत दुर्दैवी आहेत. बाभूळगावच्या गवंडी ते किन्ही रस्त्यावरील पुलाखाली मारोतराव कावे यांचा मृतदेह आढळून आला. तसेच, पुसद येथील हनुमान वॉर्डात अन्नपूर्णा मुळे या वृद्ध महिलेला भर उन्हात कुलरमध्ये पाणी भरल्यानंतर अस्वस्थ वाटू लागले आणि रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय, पुसद नगरपरिषदेच्या इंदिरानगर भागातील डम्पिंग यार्डसमोर सुभाष राठोड यांचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात सध्या प्रचंड उष्णलहरी वाहत असल्याने, भर उन्हात बाहेर पडताना नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट
हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्याला आज रेड अलर्ट जाहीर केला असून, रविवारी सर्वाधिक तापमान आणि तीव्र उष्णतेची लाट राहण्याची शक्यता वर्तवली होती. मागील तीन दिवसांपूर्वी प्रशासनाने ऑरेंज अलर्ट दिला होता, मात्र आता तापमान सातत्याने ४५ अंशांच्या पुढे जात असल्याने मे महिन्यातील हा आठवडा सर्वाधिक उष्णतेचा ठरला आहे. पुढील काही दिवस हेच चटके कायम राहणार असल्याने यवतमाळकरांना या संपूर्ण आठवड्यात तीव्र उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी शक्यतो उन्हात बाहेर पडू नये आणि कडक उन्हात शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, असे सुरक्षिततेचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
विदर्भात उष्णतेची लाट कायम
संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट कायम असून शहरांप्रमाणेच ग्रामीण भागालाही या तीव्र उकाड्याचा मोठा फटका बसत आहे. गोंदिया जिल्ह्याचे तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचले असून, वाढत्या तापमानामुळे ग्रामीण भागातील रस्ते दुपारच्या वेळी पूर्णपणे निर्मनुष्य झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या कडक उन्हाच्या झळांमुळे शेतीची कामेही खोळंबली असून, दैनंदिन जनजीवनावर मोठा परिणाम झाल्याने नागरिकांना या भीषण उष्णतेचा तीव्र त्रास सहन करावा लागत आहे.
















