मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक गुरुवारी सायंकाळी वरळी डोम येथे होणार असून या बैठकीला राष्ट्रीय कार्यकारिणी सर्व सदस्य,राज्याचे प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार खासदार) उपस्थित असतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. पक्षाचे अध्यक्षपदही त्यांनीच स्वीकारावे अशी विनंती पक्षाच्या जेष्ठ नेत्यांनी आणि आमदारांनी केली होती. त्यानुसार उद्या मुंबईत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे.
कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या संदर्भातील प्रस्ताव हा बैठकीत मांडतील. या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते अनुमोदन देतील आणि त्यानंतर सर्वानुमते सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड होईल. निवडणूक आयोगाच्या अधिका-यांच्या देखरेखीमध्ये ही सगळी प्रक्रिया पार पडेल.
पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठक मंगळवारी रात्री पार पडली. या बैठकीत राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर औपचारिक शिक्कामोर्तब करण्यात आले. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार या लढवणार आहेत. त्यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी जेव्हा निवडणूक लागेल तेव्हा त्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

