23.4 C
Latur
Sunday, March 8, 2026
Homeमहाराष्ट्रसुनेत्रा पवार यांची महायुतीत पहिलीच संयुक्त पत्रकार परिषद

सुनेत्रा पवार यांची महायुतीत पहिलीच संयुक्त पत्रकार परिषद

मुंबई : महाराष्ट्राच्या राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालणार आहे. ६ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नेहमीप्रमाणे चहापानाचा कार्यक्रम आणि संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महायुतीतील ही पहिलीच संयुक्त पत्रकार परिषद होती. यावेळी त्यांनी दिवंगत अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला आणि आपले भावनिक विचार मांडले.

उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन ही केवळ औपचारिकता नसते, तर तो संवादाचा एक मंच असतो. जनतेचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचावेत हे यातून अपेक्षित असते. यंदाचे अधिवेशन महायुती सरकारचे दुसरे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. जनतेने विश्वासाने २०२४ मध्ये पुन्हा एकदा महायुतीला विजयी केले. दिवंगत वानखेडे साहेबांच्या नंतर सर्वाधिक ११ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान अजितदादांना मिळाला.

अजितदादांनी २०११ मध्ये आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. गेल्या वर्षीही त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प हा केवळ भरीव वाढीचाच नव्हे, तर महाराष्ट्राला प्रगतीच्या मार्गाने नेण्याचे द्योतक होता. विकास आणि शिस्त याचा समतोल राखत महाराष्ट्राला सक्षम आर्थिक दिशा देण्याचे काम अजितदादांनी केले.

नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच
मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या साथीने अजितदादांची जोरदार सुरुवात झाली होती. यंदाचा अर्थसंकल्प त्यांच्या कारकिर्दीतील बारावा अर्थसंकल्प ठरला असता, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते आणि अचानक अजितदादा आपल्याला सोडून गेले. पण यापूर्वीच अजितदादांच्या टीमने अर्थसंकल्पाची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात नेली होती. यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीस सादर करतील.

महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद होईल, अशी टीका करण्यात येत होती; पण पुन्हा सत्तेत आल्यावर अजित पवारांनी योग्य आर्थिक नियोजन करून या योजनेसाठी निधीची कमतरता कधीही भासू दिली नाही. ही योजना यशस्वीपणे सुरू ठेवली. हे माझे पहिलेच अधिवेशन आहे आणि मला खात्री आहे की हे अधिवेशन अत्यंत चांगल्या प्रकारे आणि नियोजनबद्ध पद्धतीने चालेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR