मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्याने हादरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाला सावरण्यासाठी स्व. अजित पवार यांच्या पत्नी व राज्यसभा सदस्य सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद व पक्षाचे अध्यक्षपद सोपवण्याचा निर्णय घेतला असून शनिवारी होणा-या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे उद्याच सायंकाळी सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून एका छोट्याखानी सोहळ्यात शपथविधी होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील.
अजितदादांना काल अखेरचा निरोप दिल्यानंतर राजकीय घडामोडीला वेग आला आहे. अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर काल रात्री राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत ठरल्याप्रमाणे सर्वांनी आज त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आदी नेते यावेळी उपस्थित होते. सुमारे दीड तास चाललेल्या या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी, सुनेत्रा पवार यांच्या किंवा अन्य कोणत्याही नावाबाबत आज चर्चा झाली नाही, असा दावा करतानाच सुनेत्रा पवार यांनी जबाबदारी घ्यावी अशी सर्वांचीच इच्छा असल्याचे सांगितले.
आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि विधिमंडळाचे नेतेपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होते. त्याचा निर्णय आम्हाला करावा लागणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये याबाबत निर्णय करायचा आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद सोपवले जाणार का? या प्रश्नावर प्रफुल्ल पटेल म्हणाले की ‘सुनेत्रा वहिनी पवार किंवानी नावाची चर्चा आज झाली नाही, मात्र आमच्याही मनात ते आहे. आमची स्व:ताची सुद्धा भावना तशी आहे. मात्र अजूनही राजकीय शोक आहे, घरी काही धार्मिक विधी सुरू आहेत. आम्हाला याबाबत सुनेत्रा वहिनींशीही बोलावे लागेल, पार्थ पवार, जय पवार यांच्याशीही बोलावे लागेल. घरचे सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर शक्य असेल तर रात्री किंवा उद्या बोलायचा प्रयत्न करू. लवकरात लवकर ही जागा आम्हाला भरायची आहे. जनतेची भावना आणि सर्वांच्या भावनांच्या अनुरूप निर्णय होणार आहे. आमचा कुणाचाही त्यांच्या नावाला विरोध नाही, पण आम्हाला त्यांच्याशी बोलावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनीही सुनेत्रा पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल, असे जाहीर केले. अजित दादांच्या जाण्याचे दु:ख मोठे आहे. पण शो मस्ट गो ऑन म्हणतात तसे पुढे जावे लागेल. कोणावर तरी जबाबदारी देऊन हे चालवावे लागेल. उद्या विधानमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. सुनेत्राताई यांच्याकडे ते पद द्यावे असे अनेक लोकांचे मत आहे. परंतु अंतिम निर्णय बैठकीत होईल, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. बैठकीत एकमत झाले तर उद्याच शपथविधी होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यानच्या काळात सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांच्यासोबत दूरध्वनीवर चर्चा झाली व त्यांनी होकार दिल्यानंतर शनिवारी दुपारी विधिमंडळ पक्षाची बैठक घेण्याचे निश्चित करून आमदारांना तसा निरोप देण्यात आला.
…..तर, आजच शपथविधी
शनिवारी दुपारी २ वाजता विधानभवनात विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सायंकाळी जाहीर केले. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नव्या नेत्या म्हणून सुनेत्रा पवार यांच्या निवड निश्चित आहे. त्यानंतर लगेच संध्याकाळी ५ वाजता लोकभवन येथे सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. पतीच्या आकस्मिक निधनानंतर एका अवघड प्रसंगी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारणा-या सुनेत्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दिल्लीतूनही ग्रीन सिग्नल
दरम्यान, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनी आज वर्षावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत सुनेत्रा पवार यांच्या नावाबरोबरच दिवंगत अजित पवार यांच्याकडे असलेली वित्त आणि नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक विकास, क्रीडा आणि युवक कल्याण ही खाती पक्षाकडे कायम राहावीत, याबाबत चर्चा झाली. सुनेत्रा पवार यांच्या नावाला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही संमती दिल्यानंतर पुढील प्रक्रियेला वेग आला. अजित पवार यांच्याकडील खात्यांपैकी वित्त आणि नियोजन खाते मुख्यमंत्री स्वत:कडे ठेवतील, अशी चर्चा आहे. मात्र, वित्त आणि नियोजन खाते पक्षाकडे ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रही आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिक्त आहे. उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीवेळी रिक्त असलेले हे मंत्रिपद भरण्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केल्याचे समजते. याबाबत उद्याच स्पष्टता येईल.
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाची निवड झाल्यानंतर पुढील प्रक्रिया म्हणून सुनेत्रा पवार या लोकभवन येथे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यामुळे त्या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री ठरतील. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुनेत्रा पवार यांना २०२४ ची लोकसभा बारामतीमधून लढवावी लागली होती. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांना एका पोटनिवडणुकीत राज्यसभेवर पाठवण्यात आले.
विलनीकरणास दादा गट उत्सुक नाही
महापालिका निवडणुकीत दोन राष्ट्रवादीची युती झाली तेव्हा विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली होती. परंतु स्वत: अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी ही शक्यता फेटाळून लावली होती. परंतु अजितदादांच्या आकस्मिक निधनानंतर पुन्हा विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली असून, विशेष शरद पवार गटाचे नेते यासाठी अधिक प्रकर्षाने पुढे आले आहेत. राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे, माजी मंत्री अनिल देशमुख, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आदी नेत्यांनी विलीनीकरण व्हावे ही अजित पवार यांची इच्छा होती व ती पूर्ण करणे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले. अजित पवार गटातील नेत्यांनी मात्र विलनीकरणाबाबत पूर्णत: मौन बाळगले आहे. असा काही प्रस्ताव होता का ते आपल्याला माहीत नसल्याचे भुजबळ म्हणाले. विलीनीकरण झाले तर पक्षाची सूत्रे पुन्हा शरद पवारांच्या माध्यमातून अन्य लोकांकडे जातील म्हणून स्वत: प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आदी नेते यासाठी याला फारसे अनुकूल नसल्याचे समजते. त्यामुळे ही चर्चा अधिक पुढे जाण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यासाठी घाई केली जात असल्याचीही चर्चा आहे.

