मुंबई : काही दिवसांपूर्वी पुण्यात पावसाने थैमान घातले. यामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावला. ते या ठिकाणी नसतानाही धरणातून पाणी वाहिलंय. त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? असे राज ठाकरेंनी म्हटले. आत यावरून राष्ट्रवादी अजित पवार गट चांगलाच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. टोल आणि भोंग्याचे आंदोलन फसलेल्या सुपारीबहाद्दरांनी अजित पवारांवर बोलू नये. राज ठाकरेंना एनडीआरएफचा साधा लाँग फॉर्मही सांगता आला नाही म्हणजे राजकारणातील हा सर्वात मोठा जोक आहे, असा टोला अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंना लगावला.
अमोल मिटकरी म्हणाले की, दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित दादांबद्दल सुपारी बहाद्दरांनी बोलू नये. कारण हे सुपारी बहाद्दर टोल नाक्याचे आंदोलन असेल, भोंग्याचे आंदोलन असेल किंवा आणखी कुठले आंदोलन असेल त्यांना जीवनात कुठल्याही आंदोलनाला यश आले नाही. या व्यक्तीची विश्वासार्हता संपली आहे. महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखा आहे, अशी टीका त्यांनी यावेळी राज ठाकरेंवर केली.