नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली-एनसीआरमध्ये फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी करणा-या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी टिप्पणी केली. न्यायालय फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्याच्या बाजूने नाही. मात्र, याबाबत एक संतुलित आदेश पारित केला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
सणांच्या काळात लोकांच्या उत्साहावर किंवा आनंदावर गदा आणण्याची न्यायालयाची मुळीच इच्छा नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने फटाक्यांचे नियम मोडणा-यांवर आणि अवैध विक्री करणा-यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. फटाके आणि प्रदूषणाबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक अनोखा सल्ला दिला. दरवर्षी या विषयावर आदेश जारी करावे लागण्यावर भाष्य करताना न्यायालयाने म्हटले की, हा विषय आता न्यायालयासाठी केवळ एक शैक्षणिक मुद्दा बनला आहे. न्यायालयाच्या आदेशांचे पालन कमी आणि उल्लंघनच जास्त होते, असे न्यायाधीशांनी मान्य केले. केवळ बंदी घालून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघू शकत नाही, त्यामुळे केवळ कागदी आदेशांपेक्षा कठोर अंमलबजावणी आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.
सुनावणीदरम्यान दिल्ली सरकारने न्यायालयात आपले स्पष्टीकरण सादर करताना म्हटले की, सरकार वायू प्रदूषण रोखण्यासाठी अत्यंत गंभीर आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी दिल्लीत लवकरच बाहेरून येणा-या बीएस-६ वाहनांवर बंदी घालणे, सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करणे आणि स्मॉग गन्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करणे यांसारखी कडक पावले उचलली जात आहेत.
ग्रीन फटाकेही प्रदूषणमुक्त नाहीत
कोर्टाच्या मदतीसाठी नियुक्त केलेल्या अमायकस क्यूरी यांनी न्यायालयात सांगितले की, फटाक्यांमुळे अत्यंत सूक्ष्म असा पार्टिक्युलेट मॅटर बाहेर पडतो. यातील पीएम २.५ सारखे सूक्ष्म कण थेट मानवी फुफ्फुसात आणि रक्ताद्वारे शरीराच्या विविध अवयवांमध्ये पोहोचून गंभीर आजार निर्माण करू शकतात.
जनजागृतीसाठी विराट कोहलीची मदत घ्या
नवीन पिढी आधीपासूनच फटाके आणि प्रदूषणाबाबत ब-यापैकी जागरूक आहे. मात्र, फटाक्यांमुळे होणा-या प्रदूषणाविषयी जनजागृती करण्यासाठी विराट कोहलीसारख्या लोकप्रिय सेलिब्रिटींचा वापर केला गेला पाहिजे, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी न्यायालयाने केली आहे.
















