परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवार दि. ४ ऑगस्ट रोजी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षकासह वरीष्ठ पोलिस अधिकारी दाखल झाले होते.
मध्यप्रदेश येथील मुळ रहिवासी असलेला रामू एस. बामणे (२८) हा आरोपी शेती कामानिमित्त सोनपेठ येथे वास्तव्यास होता. एक महिन्याखाली बायकोच्या खुनाच्या आरोपाखाली आरोपीला अटक करण्यात आली होती. या आरोपीला ३१ जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान या आरोपीचा रविवारी दुपारी जिल्हा रूग्णालयातील वार्डमध्ये मृत्यू झाल्याचे आढळून आले. आरोपीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नांदेड येथे पाठविण्यात आला आहे. या घटनेची चर्चा दिवसभर जिल्हा रूग्णालयात होताना दिसून येत होती.