31.1 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeराष्ट्रीयस्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल

स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल

वाराणसी : प्रयागराज माघ मेळ्यात निर्माण झालेला वाद आता स्वामी अविमुक्तेश्वरानंद काशीत आल्यानंतरही संपला नाही. आमचे प्रमाणपत्र तर तुम्ही मागितले आता मुख्यमंत्री योगी यांनी त्यांचे हिंदू असल्याचे सिद्ध करावे असे सांगत त्यांनी योगींवर हल्लाबोल केला आहे. धर्म आणि सत्ता यात निर्णायक परीक्षेचा काळ आला आहे. स्वतंत्र भारतात गोमातेचे रक्षण आणि गोहत्या बंदी कायद्याची मागणी करणे सर्वात मोठा गुन्हा ठरला आहे. त्यामुळेच ज्यांनी ज्यांनी गोसंरक्षणासाठी आवाज उचलला त्यांना सरकारने दाबण्याचा प्रयत्न केला. १९६६ साली गोरक्षा आंदोलन झाले त्यावेळीही तत्कालीन सरकारने किती गोभक्त संतांना गोळ्या मारल्या याची आठवणही अविमुक्तेश्वरानंद यांनी करून देत सरकारवर निशाणा साधला.

स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, धर्मसम्राट स्वामी करपात्री महाराज यांच्यासह प्रमुख सनातनींवर अत्याचार करण्यात आले. गोसंरक्षणासाठी आम्ही आवाज उचलला म्हणून अन्याय करण्यात आला. इतकेच नाही तर आमच्या शंकराचार्य असण्याचे प्रमाणही मागण्यात आले. आमची प्रतिमा मलिन करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले गेले. या सर्वांचे नेतृत्व योगी आदित्यनाथ त्यांचे विश्वस्त रामभद्राचार्य आणि इतरांच्या माध्यमातून केले. या अत्याचाराने विचलित न होत समस्त सनातनीकडून गोरक्षणाचा संकल्प आणखी दृढ केला आहे. तुम्ही आमचे प्रमाण मागितले तर आता मुख्यमंत्री योगी यांनी ते हिंदू असल्याचे सिद्ध करावे. धर्माला सत्तेच्या प्रमाणपत्रांची गरज नाही पण सत्तेला आता त्यांची धार्मिक निष्ठा सिद्ध करावी लागेल असे त्यांनी सांगितले.

तसेच मुख्यमंत्री आदित्यनाथ, तुम्ही आमच्या भूमिकेचे आणि परंपरेचे प्रमाणपत्र मागितले. आम्ही ते तुम्हाला सहजतेने दिले. कारण सत्य पुराव्याला घाबरत नाही. पण आता आम्ही नव्हे तर तुम्ही पुरावे देण्याची वेळ आहे. संपूर्ण सनातनी समुदाय आता तुमच्या हिंदू असल्याचा पुरावा मागतो. हिंदू असणे केवळ भाषणे किंवा भगवे रंगापुरते मर्यादित नाही, त्याची परीक्षा गोसेवा आणि धर्माचे रक्षण आहे असे सांगत स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी योगी आदित्यनाथ यांना आव्हान दिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR