Homeमहाराष्ट्रस्वरस्वामिनी आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

स्वरस्वामिनी आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

सचिन तेंडुलकरसह उद्धव ठाकरेंनी घेतलं अंतिमदर्शन

मुंबई : ख्यातनाम पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यापूर्वी त्यांच्या लोअर परळमधील निवासस्थानी सर्वसामान्यांना त्यांचे अंतिमदर्शन घेता येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आशा भोसले यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, आयपीएस विश्वास नांगरे पाटील, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी आशा भोसले यांनी आशा भोसले यांचं अंतिम दर्शन घेतलं.

संगीत क्षेत्रात आपल्या कामगिरीनं कायमस्वरुपी ‘सुरेल’ ठसा उमटविणा-या आशा भोसले यांचे पार्थिव अंतिमदर्शनाकरिता लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
मराठी-हिंदीसह जगातील बहुतांश भाषांमध्ये सुरेल गाणी गाणा-या आशा भोसले यांनी सात दशकांहून अधिक काळ उत्कृष्ट काम करून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं. त्यांनी कित्येक भाषांमध्ये प्रत्येक शैलीत गाणी गाऊन जगभरातील प्रेक्षकांच्या मनात मोठं स्थान मिळवलं. नोंद झालेल्या ज्ञात माहितीचा विचार करता त्यांनी २० भाषांमध्ये १६ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. यामुळं सर्वाधिक स्टुडिओ रेकॉर्डिंगसाठी त्यांचं नाव गिनीज बुकमध्ये नोंदवण्यात आलं.

मी माझी आई गमावली : नितीन मुकेश
आशा भोसले यांच्या निधनावर गायक नितीन मुकेश यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले, त्या माझ्यासाठी आईसमान होत्या. माझ्या मुलांसाठी आजीसारख्या होत्या. मला आठवतंय, मी माझ्या नातीसोबत खेळायचो. तिला आशा भोसले यांची गाणी ऐकवायचो भावूक झालेल्या नितीन मुकेश यांनी पुढे म्हटले, मी माझं संपूर्ण आयुष्य त्यांच्यासोबत घालवले. त्या आता नाहीत. मला वाटतंय की मी माझी आई गमावली आहे. मी आशाजींना गमावले आहे. केवळ आपल्या देशातच नाही, तर जगभरात असा कोणी नसेल जो त्यांच्यावर प्रेम करत नसेल. आज आम्हाला त्यांची खूप आठवण ये आहे.

एका शतकाचा अस्त : रमेश सिप्पी
‘शोले’ चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी रविवारी ख्यातनाम गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ‘एका शतकाचा अस्त’ झाल्याचं सिप्पी यांनी म्हटलं. ते म्हणाले, आशाजींचे निधन हा खरोखरच अत्यंत वेदनादायक क्षण आहे. आशाजी एक गायिका आणि एक व्यक्ती म्हणूनदेखील अत्यंत अद्भुत होत्या. त्यांचं निधन म्हणजे जणू काही एका शतकाचाच अस्त आहे. त्या संगीताच्या इतिहासाचा भाग म्हणून सदैव राहतील. असे रमेश सिप्पी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR