नवी दिल्ली : छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि आता राजस्थान या तिन्ही राज्यांना नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. आता भाजपने शपथविधीची जय्यत तयारी सुरू केली आहे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये बुधवारी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मोहन यादव बुधवारी सकाळी ११ वाजता मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. यानंतर दुपारी २ वाजता छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. या दोन्ही समारंभांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप आणि एनडीए शासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
दोन्ही राज्यात शपथविधी सोहळ्यासाठी विस्तृत व्यवस्था करण्यात येत आहे. विशेषत: यादव यांचे मूळ गाव उज्जैन येथील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला जमतील. राज्याच्या राजधानीतील लाल परेड मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना भाजपचे मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष विष्णू दत्त शर्मा म्हणाले की, पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपशासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
छत्तीसगडमध्येही दोन उपमुख्यमंत्री?
छत्तीसगड सरकारच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री असतील अशीही शक्यता वर्तवली जात आहे. एक उपमुख्यमंत्री इतर मागासवर्गीय तर दुसरा सामान्य प्रवर्गातील असू शकतो. प्रभावशाली साहू (तेली) ओबीसी समाजातून आलेले प्रदेशाध्यक्ष साहू हे उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जात आहे. वकिली सोडून राजकारणी बनलेले साहू वादांपासून दूर राहिले आहेत आणि एक तटस्थ नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.